ठाणे Railway Accident : लोकलमधून प्रवास करणाऱ्या वर्षीय जगन जंगले (31) या तरुणाच्या हातावर गर्दुल्यानं लाकडी दांड्यानं फटका मारल्यानं तो लोकलमधून खाली पडून गंभीर जखमी झालाय. या घटनेत जगन जंगले या रेल्वे प्रवशाला आपले दोन्ही पाय गमवावे लागलेत. या घटनेनं तीव्र संताप व्यक्त होत असून यातील नेमक्या प्रकाराचा आणि आरोपीचा शोध ठाणे रेल्वे पोलीस (Thane Railway Police) घेत आहेत.
दोन्ही पायांवरून गेली लोकल: दादरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉल येथे कामाला असलेले जगन हे कल्याण येथील रहिवासी आहेत. तीन महिन्या पूर्वीच जगन यांचं लग्न झालंय. नेहमीप्रमाणं जगन यांनी 22 मे रोजी कल्याणला जाणारी लोकल रात्री साडेआठच्या सुमारास दादर स्थानकातून पकडली. ठाणे स्थानकातून लोकल निघाल्यानंतर कळवा-ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान लोकल आल्यानंतर दरवाजात उभे असलेल्या जगन यांच्या हातातील मोबाईल चोरी हिसकावण्यासाठी एका गर्दुल्यानं त्यांच्या डाव्या हातावर लाकडी दांडक्यानं फटका मारला. यात तोल गेल्यानं जगन हे फलाट क्रमांक दोनपासून 200 मीटर पुढे लोकलमधून खाली पडले. त्याचवेळी त्यांचा मोबाईलही गहाळ झाला. या घटनेमध्ये जगन यांच्या दोन्ही पायांवरून लोकलचे चाक गेल्यामुळं ते गंभीर जखमी झाले. त्यांना रेल्वे पोलिसांसह काही प्रवाशांच्या मदतीनं तातडीनं कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं होतं.
दोन्ही पायावर झाली शस्त्रक्रिया : जगन याच्या पायावर तातडीनं शस्त्रक्रिया करावी लागणार असल्यानं त्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याठिकाणी त्यांच्या दोन्ही पायावर शस्त्रक्रिया करून कापावे लागले. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, जगन हे नेमकं कसं पडले, त्यांना कोणी पाडले, त्यांचा मोबाईल चोरी कोणी हिसकावला? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.