मुंबई Dhangar and Dhangad :धनगर व धनगड दोन्ही समाज एकच आहेत, या बाबत सरकारी जीआर काढण्यासाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळातील पाच सदस्य व राज्याचे तीन वरिष्ठ आयएएस अधिकारी यांची समिती नेमून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
या बाबत राज्य सरकारने जीआर काढण्याची मागणी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने केली होती. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळा सोबत बैठक बोलावली होती. रविवारी सह्याद्री अतिथी गृहात ही बैठक पार पडली. मंत्री शंभूराज देसाई या बैठकीला उपस्थित होते.
सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारने धनगर व धनगड हे दोन्ही एकच आहेत असा जीआर काढण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी तीन वरिष्ठ आयएएस अधिकारी तसेच सकल धनगर समाजाचे पाच प्रतिनिधी यांची एक समिती स्थापन करण्यात येईल व ही समिती या जीआर संदर्भात काय मसुदा असावा याबाबत चर्चा करून निर्णय घेईल, अशी माहिती शंभुराज देसाई यांनी दिली.
सरकारने याबाबत जो जीआर काढेल तो भविष्यात न्यायालयात टिकण्यासाठी राज्याच्या महाधिवक्तांचे याबाबत काय मत आहे हे देखील जाणून घेण्यात येईल. या सर्व बाबीनंतर धनगर व धनगड हे दोन्ही समाज एकत्र असल्याचा राज्य सरकारचा जीआर काढण्याबाबत सकारात्मक अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शंभूराजे देसाई यांनी दिली.
धनगर समाजाला सध्या महाराष्ट्रात एनटी संवर्गातून आरक्षण मिळते. मात्र देशभरात धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळते. त्यामुळे त्या धर्तीवर महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजातर्फे पंढरपूर येथे उपोषण सुरू आहे.
पंढरपुरात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची सरकारतर्फे शंभुराज देसाई व चंद्रकांत पाटील या मंत्र्यांनी शनिवारी भेट घेतली होती. मात्र उपोषणकर्ते मागणीवर ठाम असल्याने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन रविवारी तातडीने या समाजाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली. त्यामध्ये धनगर समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी चर्चा करण्यात आली. जीआर काढण्याबाबत निर्णय झाल्याने उपोषणकर्त्यांनी त्यांचे उपोषण सोडावे अशी विनंती राज्य सरकारतर्फे देसाई यांनी केली आहे. त्यासाठी विभागीय आयुक्तांना पंढरपूर येथे पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. धनगर समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याने समाजाने देखील सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन शंभुराज देसाई यांनी केले.
हेही वाचा...
- समितीला अध्यक्षच नाही, धनगर आरक्षणाचे घोंगडं भिजत
- धनगर समाज आरक्षण : देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; समिती करणार छत्तीसगड, उत्तर प्रदेशचा दौरा