शिर्डी :अंगावर मळालेले कपडे, अनवाणी पाय. . .डोक्यावर वाढलेल्या जटा, थरथरणारे हात . . .कोणी आधुनिक तोऱ्यात मिरवणाऱ्यांनी तिरस्कार करावा, असा जटाधारी अवतार. मात्र या साध्यासुध्या वाटणाऱ्या 85 वर्षीय भाविकानं आपली जमीन विकून आयुष्यभराची कमाई साईचरणी अर्पण केली. मळक्या वाटणाऱ्या या भाविकानं तब्बल 3 लाखाची देणगी साईचरणी अर्पण केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फक्त साईचरणीच 3 लाख अर्पण केले असं नाही, या भाविकानं जनार्दन स्वामींसह अनेक संस्थांना देणगी दिली आहे. त्यामुळे दिसते तसं नसते, या म्हणीचा इथं प्रत्य आला. नरसिंगराव बंडी असं या आयुष्याची कमाई साईचरणी अर्पण करणाऱ्या भाविकाचं नाव आहे. ते मूळचे हैदराबादचे असून सध्या हिंगोलीत राहतात. नरसिंगराव बंडी सुतार असून आजही ते सुंदर नक्षीकाम करतात.
भाविक नरसिंगराव सखय्या बंडी यांचा सत्कार (Reporter) मूळचे हैदराबादचे आहेत नरसिंगराव सखय्या बंडी :शिर्डीत 85 वर्षीय जटाधारी वयोवृद्ध भाविकानं साईबाबांच्या चरणी तब्बल 3 लाख रुपयांची देणगी दिली आहे. मूळ हैद्राबाद इथले रहिवासी असलेले नरसिंगराव सखय्या बंडी आता महाराष्ट्रातील हिंगोली इथं स्थायिक आहेत. ते गेल्या 53 वर्षांपासून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. बंडी हे सुतार कारागीर असून यांनी वेगवेगळ्या कारखान्यात काम करत अतिशय सुंदर कारागिरी करत लाकडी वस्तू घडवल्यात. याच दरम्यान त्यांनी आपल्या जीवनात कमावलेल्या पैशातून महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात जमीन विकत घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. मात्र वय झाल्यानं शेती होत नसल्यानं शेती विकून आलेल्या पैशातून शिर्डी साईबाबांना काही तरी द्यायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. अखेर तीन लाख रुपयांची देणगी संस्थानला देत त्यांनी आपली इच्छाही पूर्ण केली.
भाविक नरसिंगराव सखय्या बंडी (Reporter) शिर्डी साईबाबांचे परमभक्त, अनेक संस्थानला दिली देणगी :नरसिंगराव बंडी हे शिर्डी साईबाबांचे परमभक्त आहेत. त्याच बरोबर जनार्दन स्वामी यांचेही भक्त असल्यानं त्यांनी या आधी कोपरगाव येथील जनार्दन स्वामी संस्थेला अनेकदा देणगी दिली आहे. मात्र आपण साईबाबांना केलेला नवस पूर्ण झाल्यानं साईबाबा संस्थानला देणगी देण्याची त्यांची इच्छा होती. "आज माझ्या स्वेच्छेनुसार साईबाबांना तीन लाख रुपयांची देणगी दिली, असं यावेळी नरसिंगराव बंडी म्हणाले. साईभक्त नरसिंगराव बंडी ज्यावेळी साईबाबा मंदिर परिसरात आले, त्यावेळी त्यांच्या अंगावर मळालेले कपडे आणि डोक्यावर वाढलेल्या जटा होत्या. वयही 85 वर्ष त्यात हातही थरथरत होते. अशा भाविकानं साईबाबांना तब्बल तीन लाख रुपयांची देणगी दिली असं समजल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं ही म्हण आज प्रत्यक्षात भाविकांना अनुभवायला मिळाली.
भाविक नरसिंगराव सखय्या बंडी (Reporter) साईसंस्थानच्या वतीनं करण्यात आला सत्कार :नरसिंगराव बंडी यांनी बुधवारी साईबाबा संस्थानला 3 लाख रुपयांची देणगी दिली. त्यानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी शॉल, साई मूर्ती देवून बंडी यांचा सत्कार केलाय. ज्या पद्धतीनं करोडो रुपयांची देणगी देणाऱ्या भाविकाचा संस्थानच्या वतीनं सन्मान करण्यात येतो, अगदी तसाच सत्कार बंडी यांचा करण्यात आला. त्यामुळे साईंच्या दरबारात कोणी लहान आणि मोठं नाही, सर्व भाविक सारखेच याची प्रचिती आज अनुभवण्यास मिळाली आहे.
हेही वाचा :
- साईंबाबांच्या देणगीत पाच वर्षांत तब्बल इतक्या टक्क्यांची वाढ, आकडे ऐकून धक्काच बसेल
- शिर्डीतील साईबाबा मूर्तीची तज्ज्ञांमार्फत तब्बल अडीच तास पाहणी; दिल्या 'या' सूचना
- महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा साई चरणी नतमस्तक, संस्थानला नवीन प्रकल्पासाठी सीएसआर फंडातून करणार मदत