महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कंगाल व्हायचं असेल तर शिव्या देत राहा, 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा ठराव

अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. गावात बालकामगार आणि शिव्या देण्यास बंदी घातल्यात आली आहे.

saundala grampanchayat
सौंदाळा ग्रामपंचायतीचा आदर्श निर्णय (Source : ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

Updated : 3 hours ago

अहिल्यानगर :अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावानं राज्यात मोठा आदर्श उभा केलाय. गावात शिवी हासडली, मुलांच्या हातात संध्याकाळी 7 ते रात्री 9 यावेळेत मोबाईल दिला, किंवा गावात बालकामगार आढळल्यास तो कंगालच झाला म्हणून समजा. असा ठरावच सौंदाळा गावानं ग्रामसभेत घेतला असून त्याच्या अंमलबजावणीला आजपासून सुरुवात करण्यात आलीय. या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय.

गावात अनेक ठिकाणी लागले बॅनर : नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला आणि पुरुषांनी तसंच बाहेरुन आलेल्या लोकांनी यापुढं शिव्या द्यायच्या नाहीत. जर शिव्या दिल्या तर 500 रुपयांचा दंड सक्तीनं आकारण्यात येईल, असा ठराव करण्यात आलाय. तसंच यासंदर्भातील बॅनर ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत.

सौंदाळा ग्रामपंचायतीचा आदर्श निर्णय (ETV Bharat Reporter)

ग्रामसभेत 'हे' तीन ठराव मंजूर :आई-बहिणीवरुन शिवी देणाऱ्यांकडून 500 रुपयांचा सक्तीचा दंड आकारण्याचा निर्णय गावानं घेतलाय. तसंच सेलफोनच्या अतिरिक्त वापरामुळं शालेय विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचं निदर्शनास आल्यानं यापुढं संध्याकाळी 7 ते रात्री 9 यावेळेत घरातील शालेय विद्यार्थ्यांकडं मोबाईल द्यायचा नाही. मोबाईल दिसला तर त्या कुटुंबीयांना 500 रुपये दंड भरावा लागेल. तसंच बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा, असं घोषवाक्य ठरवून बालकामगार निदर्शनास आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून द्यावा, त्या व्यक्तीस एक हजार रुपये बक्षीस दिलं जाईल, असाही ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आलाय.

ग्रामस्थ देखील काटेकोर पालन करणार : समाजहिताचे निर्णय घेण्याच्या बाबतीत सौंदाळा गाव आघाडीवर राहिलं आहे. यावेळी ग्रामसभेत आई आणि बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्यात आली आहे. जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झाल्याने स्थानिकांनी देखील या निर्णयाचं स्वागत करत काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचं म्हटलंय.

शिवी देणाऱ्याला असे पकडले जाणार : सौंदाळा गावात ठीक-ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना ऑडिओही बसवण्यात आलाय. त्यामुळं कोणीही शिवी दिली तर लगेचच ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांना याची माहिती कळेल. इतकंच नाही तर सायंकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे एक पथक गावात फिरणार आहे. या वेळेत शालेय विद्यार्थ्यांकडं सेलफोन आढळल्यास त्यांच्या पालकांकडून 500 रुपये दंड आकारण्यात येईल. तसंच बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी कोणीही बालकामगार कामाला ठेवू नये आणि ठेवल्यास त्याच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्याच बरोबर कोणालाही बालकामगार निदर्शनास आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडं आणून देणाऱ्याला एक हजार रुपये बक्षीस दिलं जाणार असल्याची माहिती सरपंच शरद आरगडे यांनी दिलीय.

प्रामाणिकपणे दोघांनी भरला दंड (ETV Bharat Reporter)

प्रामाणिकपणे दोघांनी भरला दंड -सौंदाळा गावातील शांताराम आढागळे आणि ठकाजी आरगडे यांचा शेतीच्या बांधावरून वाद झाला. तेव्हा त्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या. सकाळी सरपंच शरदराव आरगडे यांनी सदर वादाचा मुद्दा असलेल्या बांधावर जाऊन त्यांना बांधावर पोल उभे करण्याचं सांगून वाद मिटवला. यावेळी दोघांनीही एकमेकांना शिव्या दिल्याचं प्रामाणिकपणे मान्य करून ग्रामपंचायतचा ५०० रुपये दंड भरला. ग्रामपंचायतने त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करून यापुढे शिव्या देऊन स्त्री देहाचा अपमान न करण्याचा सल्ला देऊन बांध भाऊ म्हणुन गोडीगुलाबीने राहण्यास सांगितलं. दंड भरून यापुढे शिवीगाळकरणार नसल्याचं ठकाजी आणि शांताराम यांनी सांगितलं. यावेळी ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांनी दंड रक्कम ग्रामनिधित भरणार असून सदरच्या रकमेतून शिवीगाळ न करण्यासाठी प्रबोधन व्हावे म्हणून फ्लेक्स बोर्ड लावणार असल्याचं सांगितलं.

प्रामाणिकपणे दोघांनी भरला दंड (ETV Bharat Reporter)

हेही वाचा -

  1. शेतकऱ्याच्या पोरानं माळरानावर सुरू केलेल्या 'द बाप कंपनी'ला युरोपियन पाहुण्यांची भेट
  2. गोवऱ्या विक्रीतून अमोल खुळे कमवतोय बक्कळ पैसा, बँकेच्या जनरल मॅनेजरची नोकरी सोडून उभारला उद्योग - Business Success Story
  3. Free Education to Students: शिक्षकाकडून घरोघरी जाऊन मोफत शिक्षण, गाव तांड्यावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो फायदा
Last Updated : 3 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details