मुंबई Lok Sabha Elections :लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघांमध्ये निवडणुका होत असून यासाठी अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 27 मार्च आहे. 28 मार्च रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 30 मार्च आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली आहे. आतापर्यंत रामटेक मतदारसंघात अर्ज एक अर्ज, नागपूर मतदारसंघात पाच, भंडारा गोंदिया मतदारसंघात दोन, गडचिरोली चिमूर मतदार संघात दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं.
आचारसंहिता भंगाची कारवाई :राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत 23 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या पैशांची तपासणी सुरू असून त्यात काही गैर आढळल्यास कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. यामध्ये सर्वाधिक साडेतीन कोटी रुपये मुंबई उपनगर जिल्हात आढळले, असं चौकलिंगम यांनी सांगितलं. 17 लाख लिटर दारू आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे, तर 633 किलो अमली पदार्थ जब्त करण्यात आल्याचं ते म्हणाले. 308 परवाना नसलेली शस्त्रे, जप्त करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत 13 हजार 141 व्यक्तींवर कारवाई करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
300 पेक्षा अधिक अर्ज आल्यास मतपत्रिकेवर निवडणुका :राज्यात काही मतदारसंघांमध्ये अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोग सक्षम असून सर्व पद्धतीनं निवडणुका घेण्याची तयारी आहे. तीनशे उमेदवारांपर्यंत ईव्हीएम मशीन वापरू शकतो. त्यापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यास मतपत्रिकेवरही निवडणुका घेतल्या जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं.