अहमदनगर Ahmednagar Food Poisoning :जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील करवंदरा गावात हळदीच्या कार्यक्रमाच्या (Haldi Program) जेवणातून दोनशेहून अधिक लोकांना विषबाधा झालीय. या प्रकरणानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विषबाधा झालेल्या व्यक्तींमध्ये सात बालकांचा समावेश आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आजी-माजी आमदारांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन रुग्णांना मदत करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
हळदीच्या कार्यक्रमात विषबाधा : अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा गावातील सोमा दगडू भांगरे यांचा मुलगा सखाराम याचा विवाह, पाडोशी येथील रामभाऊ साबळे यांच्या मुलीशी निश्चित झाला होता. मात्र नवरदेवाकडं हळदीचा कार्यक्रम बुधवारी रात्री असल्यानं दोनशे नातेवाईक जेवणासाठी आले होते. मात्र रात्री जेवल्यानंतर काही वऱ्हाडी यांना रस्त्यातच उलट्या, जुलाब होऊ लागल्यामुळं त्यांना तातडीनं संगमनेर, नाशिक, राजुर रुग्णालय, कोहणे, खिरविरे रुग्णालयात हलवण्यात आलं. विषबाधा झालेल्या रुग्णांत महिला आणि मुलांचाही समावेश आहे. आता सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलंय जातय.