पुणे HSC Exam 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत, फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणारी 12 वीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आलीय.
३३२० मुख्य केंद्रांवर होणार परीक्षा :परीक्षेसाठी एकूण १५,१३,९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीय. त्यामध्ये ८,२१,४५० विद्यार्थी आणि ६,९२,४२४ विद्यार्थीनी आहेत. एकूण १०४९७ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालीय. संपूर्ण राज्यात ३३२० मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलीय.
इतक्या विद्यार्थ्यांनी केली नोंदणी :21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी विज्ञान शाखेतून 7,60,046, तर कला शाखेतून 3,81,982 विद्यार्थी तसेच वाणिज्य शाखेसाठी 3,29,905 विद्यार्थी आणि किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमासाठी 37,226 त्याचबरोबर आयटीआयसाठी 4,750 म्हणजेच एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीय.
छपाई केलेलं वेळापत्रक ग्राह्य :विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीनं फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिध्द आणि छपाई केलेलं वेळापत्रक ग्राह्य धरालं जाणार आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेनं छपाई केलेलं वेळापत्रक ग्राह्य धरलं जाणार नाही.
१० समुपदेशकांची नियुक्ती : परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचारानं किंवा परीक्षेच्या भितीनं मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलीय. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलीय. तसेच राज्य मंडळ आणि ९ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलीय.
परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर या :सर्व परीक्षाध्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. सकाळच्या सत्रात स. १०.३० वाजता आणि दुपारच्या सत्रात दु. २.३० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणं आवश्यक आहे. गतवर्षीप्रमाणेच परीक्षेसाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे.
हेही वाचा -
- SSC HSC Exam : विद्यार्थ्यांनो! रील सोडा अभ्यासाला लागा; वर्षातून दोनदा द्यावी लागणार बोर्डाची परीक्षा
- Transgender Success Story: तृतीयपंथीय म्हणून मिळणाऱ्या टोमण्यांना सेजलने दिले उत्तर, बारावीत मिळविले प्रेरणादायी यश
- HSC Exam : उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदल, बोर्डाने पाठवली नोटीस