ठाणे Minor Kidnapped And Killed :खंडणीसाठी चिमुरड्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर-कर्जत मार्गावर असलेल्या गोरेगावात घडली. याप्रकरणी कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे भयानक कृत्य करणाऱ्या दोन भावांसह त्यांच्या कुटूंबातील पाच जणांना तीन तासातच गजाआड करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आलंय. सलमान मौलवी आणि त्याचा भाऊ सफूआन मौलवी अशी अटक केलेल्या दोन भावांची नावं आहेत.
चिमुरड्याचं केलं अपहरण :मृत मुलगा हा कुटुंबासह अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर-कर्जत मार्गावर असलेल्या गोरेगावात राहत होता. तर त्याच्या शेजारीच आरोपी सलमान व सफूआन कुटूंबासह राहत आहेत. सलमान हा बदलापूरमधील गॅरेजवर तर दुसरा आरोपी हा वाईंडिंगचं काम करतो. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या घराचं नव्यानं उभारणीचं काम सुरू आहे. घर बांधण्यासाठी पैशाची गरज होती. त्याकरीता मृताच्या शेजारी राहणारा आरोपी सलमान मौलवी आणि त्याचा भाऊ सफूआन मौलवी या दोघांनी २४ मार्च रोजी एक प्लॅन केला होता. त्याचदिवशी मृत मुलगा हा सायंकाळी बाहेर गेला होता, त्यावेळी रात्री ९ च्या सुमारास मुलगा बेपत्ता झाल्याचं समोर आलं. त्यामुळं त्याचे नातेवाईक व गावातील तरुण त्याचा शोध घेत होते. त्याचवेळी मुलाच्या वडिलांना मोबाईलवर कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं की, "तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत पाहिजे असल्यास त्या बदल्यास २३ लाख रुपये द्या." त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीचा फोन बंद झाला.
चिमुरड्याची केली हत्या :मुलाच्या वडिलांनी लगेच या प्रकरणाची माहिती कुळगाव पोलिसांना दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून ग्रामीण गुन्हे शाखा आणि स्थानिक ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला. एकीकडं पोलीस मुलाला शोधत होते. तर दुसरीकडं ग्रामस्थांकडूनही शोध घेतला जात होता. त्याचवेळी अपहरणकर्त्यानं मोबाईलमध्ये दुसरं सीम कार्ड टाकून फोन करण्याचा प्रयत्न करताच आरोपीचं मोबाईल लोकेशन पोलिसांना कळून आलं. पोलीस थेट त्याच गावातील फोन करणाऱ्या आरोपी सलमान मौलवी याच्या घरात दाखल झाले. त्यानंतर बेपत्ता असलेल्या मुलाची शोधाशोध सुरु केली. त्याच सुमारास आरोपीच्या घराच्या मागच्या बाजूला एका खड्ड्यातील गोणीत मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह जे जे रुग्णालयात रवाना केला होता.