अमरावती Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत 22 जानेवारीला भव्य मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची विधिवत स्थापना केली जाणार आहे. अमरावती शहरालगत असणाऱ्या हनुमान गढी येथे 11 टन वजनाचा आणि पंधरा फूट उंच असा बुंदीचा लाडू तयार होतोय. खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या वतीनं हा विशेष लाडू तयार केला जातोय.
असा आहे हा बुंदीचा लाडू : अमरावती शहरातील जगदीश प्रजापती या आचाऱ्याच्या नेतृत्वात एकूण 40 कारागिरांच्या वतीनं हा भला मोठा बुंदीचा लाडू तयार केला जातो आहे. 17 जानेवारी पासून हा लाडू तयार करण्याचं काम सुरू असून यासाठी 26 क्विंटल बेसन, 26 क्विंटल तूप, पाऊण क्विंटल साखर, आठ क्विंटल मेवा वापरण्यात आल्याची माहिती हा लाडू बनवणारे आचारी जगदीश प्रजापती यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली आहे.
देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित :हनुमान गढी येथे हनुमानाची एकूण 111 फूट उंच हनुमानाची मूर्ती उभारली जात आहे. त्याच ठिकाणी हा 11 टन वजनाचा लाडू तयार केला जातो आहे. प्रभू श्रीराम अयोध्येत भव्य मंदिरात विराजमान होत असताना या ठिकाणी बुंदीचा भव्य लाडू प्रसाद स्वरूपात येथे येणाऱ्या हजारो भाविकांना वितरित केला जाणार आहे. या पर्वावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्यानं उपस्थित राहणार असल्याची माहिती बडनेराचे आमदार रवी राणा यांनी दिली आहे.