मुंबईCyber Fraud Mumbai: मुंबईत सायबर फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याबाबत सायबर पोलिसांमार्फत वेळोवेळी जनजागृती कार्यक्रम राबविले जातात आणि सायबर ठग फसवणुकीच्या नवनवीन युक्त्या वापरत असतात. दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी अशाच एका गुन्ह्याची नोंद केली आहे. ज्यामध्ये सायबर ठगांनी बँक अधिकारी असल्याचे भासवून बँक खात्याचे तपशील काढून तक्रारदाराच्या खात्यातून 1 कोटी 48 लाख 56 हजार रुपयांची ऑनलाइन शॉपिंग करून फसवणूक केली. ही माहिती मिळाल्यानंतर दक्षिण विभागाच्या सायबर पोलिसांनी ६० लाख रुपयांची ऑनलाइन डिलिव्हरी तत्काळ रोखून धरली आणि ७ आरोपींच्या मुसक्या कोलकाता येथून आवळल्या आहेत.
अशा प्रकारे करायचे फसवणूक :याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी अनेक पथके तयार केली. नंतर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला. आरोपी कोलकता मधील सिलीगुडी येथे कॉल सेंटर चालवत असल्याचं तपासात समोर आलं आहे. तेथून ते तक्रारदाराला बँक अधिकारी असल्याची बतावणी करून फोनवर ग्राहकाला फसवणूक झाल्याचं सांगायचे. बँकेचे तपशील घेतल्यानंतर ते फ्लिपकार्ट, कॅरेटलेन, मिंत्रा, स्विगी येथून महागड्या वस्तू ऑनलाईन मागवायचे.
क्रेडिटद्वारे महागड्या वस्तू मागविल्या :या गुन्ह्याच्या तपासात अशी माहिती समोर आली आहे की, आरोपींनी तक्रारदाराच्या 1 कोटी 48 लाख 56 हजार रुपयांचा वापर करून ऑनलाइन शॉपिंग केली. त्याचप्रमाणे वॉन्टेड आरोपीने ऑनलाईन क्रेडिटद्वारे महागड्या वस्तू मागविल्या आणि त्या वस्तू कोलकाता येथे विविध ठिकाणी डिलिव्हरी झाल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलीस पथक कोलकाता येथे रवाना करण्यात आले होते. या ठिकाणी पोलीस आल्याचं कळताच आरोपी सिलिगुडी येथे पळून गेले होते. या ठिकाणी जाऊन स्थानिक पोलीस ठाण्याच्या मदतीनं मुंबई पोलिसांनी आरोपींना शिताफीनं ताब्यात घेतलं.