बुलावायो ZIM Beat PAK by 80 Runs : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं असताना पाकिस्तानी क्रिकेट संघ आणखी एक वनडे सामन्यात हरला आहे. पाकिस्तान सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करत आहे, मात्र छोट्या संघाविरुद्धच्या पराभवानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे. पावसामुळं सामन्याचा निकाल डीएलएसद्वारे घोषित करण्यात आला असला तरी सामना पूर्ण झाला असता तरी पाकिस्तानचा पराभव झाला असता. झिम्बाब्वे ज्या पद्धतीनं खेळला त्यामुळं वनडे क्रिकेटमध्येही पाकिस्तानी संघाचा पर्दाफाश झाला आहे. मालिकेत अजून दोन सामने बाकी आहेत. जे पाकिस्तानला कोणत्याही किंमतीवर जिंकावे लागतील.
झिम्बाब्वे संघ 50 षटकंही खेळू शकला नाही : पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करताना केवळ 205 धावा केल्या. संघाला 50 षटकांचा कोटाही खेळता आला नाही आणि केवळ 40.2 षटकं खेळता आली. यानंतर पाकिस्तानी संघ हा सामना आरामात जिंकेल असं वाटत होतं, पण पाकिस्तान यापेक्षाही वाईट खेळ दाखवेल हे कोणास ठाऊक होतं. एकवेळ झिम्बाब्वेच्या 7 विकेट केवळ 125 धावांवर पडल्या होत्या, पण त्यानंतरही संघानं चांगली फलंदाजी करत धावसंख्या 200 च्या पुढं नेली.
पाकिस्तानीनं 60 धावांवर गमावल्या 6 विकेट : यानंतर पाकिस्ताननं फलंदाजीला सुरुवात केली तेव्हा संघाला 21 षटकांत 6 गडी गमावून केवळ 60 धावा करता आल्या. दरम्यान पाऊस पडला आणि सामना थांबवावा लागला. यानंतर पाऊस थांबला तर सामना पुढं जाईल, अशी आशा होती, पण पाकिस्तानची अवस्था फारच दयनीय झाली होती. पाऊस थांबला नाही तेव्हा झिम्बाब्वे संघानं डकबर्थ लुईस पद्धतीनुसार 80 धावांच्या मोठ्या फरकानं हा सामना जिंकला. झिम्बाब्वेसारख्या लहान समजल्या जाणाऱ्या संघाविरुद्धचा पराभव पाकिस्तानसाठी खोल जखमा करुन गेला आहे.