गॉल WTC Point Table 2023-25 : श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना गॉल येथील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेनं न्यूझीलंडचा एक डाव आणि 154 धावांनी पराभव केला. यासह यजमान संघानं मालिका 2-0 अशी खिशात घातली आणि पाहुण्या संघाचा सफाया केला.
15 वर्षांत पहिला मालिका विजय : श्रीलंकेनं किवी संघाविरुद्ध 15 वर्षात पहिली कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला. दुसऱ्या डावात फॉलोऑन मिळाल्यानंतर न्यूझीलंडनं चौथ्या दिवशी 360 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सनं सर्वाधिक 78 धावा केल्या. याशिवाय डेव्हन कॉनवेनं 61 धावा, टॉम ब्लंडेलनं 60 धावा आणि मिचेल सँटनरनं 67 धावा केल्या. तर श्रीलंकेसाठी निशान पेरीसनं पदार्पणातच 33.4 षटकांत 170 धावा देत सर्वाधिक 6 बळी घेतले. तर प्रभात जयसूर्यानं 3 आणि कर्णधार धनंजय डी सिल्वानं एक विकेट घेतली.
परदेशी भूमीवर एकही विजय नाही : किवी संघाला हरवत श्रीलंकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या जवळ पोहोचला आहे. त्याचबरोबर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंड संघाच्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात किवी संघ हा एकमेव संघ आहे ज्यानं परदेशी भूमीवर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019 मध्ये सुरु झाली. तेव्हापासून आतापर्यंत डब्ल्यूटीसीच्या इतिहासात किवी संघाला (2021 चा अंतिम सामना वगळता) परदेशी भूमीवर एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही.
न्यूझीलंडला मोठा धक्का : श्रीलंकेच्या संघ 9 सामन्यांत पाच विजय आणि चार पराभवांसह 60 गुण आणि 55.56 पीसीटी आहे आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानं किवी संघाचं मोठं नुकसान झालं आहे. न्यूझीलंडची तिसऱ्या स्थानावरुन थेट सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. न्यूझीलंडचे 8 सामन्यांत 3 विजय आणि 5 पराभवांसह 36 गुण आणि 37.50 पीसीटी आहेत. न्यूझीलंडला अंतिम फेरी गाठणं आता जवळजवळ अशक्य आहे. याशिवाय पहिल्या कसोटीत बांगलादेशला पराभूत करुन भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर कायम आहे.
हेही वाचा :
- भारत दौऱ्यापूर्वी न्यूझीलंडला धक्का, कसोटी मालिकेत श्रीलंकेकडून 'क्लीन स्वीप'; 15 वर्षांनंतर 'असं' घडलं - SL Beat NZ in 2nd Test
- कानपूर कसोटी: पाऊस नसतानाही सामन्याचा तिसरा दिवस रद्द; सामना अनिर्णित होण्याच्या मार्गावर - IND vs BAN 2nd Test Day 3