नवी दिल्ली 7 Rupees Coin :भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे जगभरात चाहते आहेत. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आजही धोनी लोकप्रियतेच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. धोनीची ही लोकप्रियता त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी समस्या बनत आहे कारण सोशल मीडियावर त्याच्या नावानं अशा बातम्या पसरत आहेत ज्या खरोखरच धक्कादायक आहेत. सोशल मीडियावर अशी अफवा पसरली, की सरकार धोनीच्या नावानं 7 रुपयांचं नाणं आणत आहे, ज्यावर त्याचा फोटो असेल. मात्र यात सत्यता नाही.
धोनीच्या नावानं पसरवलेलं 7 रुपयांचं नाणं खोटं :धोनीच्या नावानं 7 रुपयांचं नाणं जारी केल्याची बातमी निराधार आहे, ती पूर्णपणे चुकीची असून हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं केलेल्या तथ्य तपासणीत उघड झालं आहे. सरकारनं अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. पीआयबी फॅक्ट चेकनं त्यांच्या एक्स हँडलवर म्हटलं आहे की, 7 रुपयांच्या नाण्याचं चित्र खोटं आहे आणि आर्थिक व्यवहार विभागानं असं नाणं आणण्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही आणि भविष्यात अशी कोणतीही योजना नाही.
कोणत्या क्रिकेटपटूच्या नावानं जारी करण्यात आली नोट : धोनीच्या नावानं कोणतंही नाणं जारी केलं जात नाहीये पण एक क्रिकेटपटू आहे ज्याचा फोटो नोटांवर छापलेला आहे. हा खेळाडू म्हणजे वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज फ्रँक वॉरेल. जो वेस्ट इंडिजचा पहिला कृष्णवर्णीय कर्णधार देखील होता. बार्बाडोसच्या नोटांवर फ्रँक वॉरेलचा फोटो छापलेला आहे. पाच डॉलरच्या नोटांवर त्याचा फोटो छापलेला आहे. वॉरेलनं वेस्ट इंडिजच्या सर्व बेटांना एकत्र केलं आणि त्यांचा एक क्रिकेट संघ तयार केला. वॉरेलनं वेस्ट इंडिजसाठी 51 कसोटी सामन्यात 49.48 च्या सरासरीनं 3860 धावा केल्या. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 39 शतकंही ठोकली आहेत.
धोनी 4 वर्षांपूर्वी झाला निवृत्त : भारतीय संघाला 3 आयसीसी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कर्णधार धोनीनं चार वर्षांपूर्वीच निवृत्ती घेतली आहे. 15 ऑगस्ट 2020 रोजी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र तरी तो आयपीएलमध्ये चैन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळत आहे.
हेही वाचा :
- सुपर किंग्जविरुद्ध घरच्या मैदानावर कॅपिटल्स पहिला सामना जिंकणार? फुकटात 'इथं' पाहा लाईव्ह मॅच
- चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने स्टेडियममध्ये बघायचे? पनीरपेक्षाही स्वस्त मिळतंय मॅचचं तिकीट