हैदराबाद Nitish Kumar : नितीश कुमार हे नाव सध्या जगभरात चर्चेत आहे. राजकारण असो की खेळ याच नावाची सध्या चर्चा आहे. राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तिसऱ्यांदा स्थापन होणाऱ्या एनडीए सरकारमध्ये 'किंग मेकर' म्हणून उदयास आले आहेत. नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड (JDU) नं 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 12 जागा जिंकल्या आहेत आणि मोदी 3.0 मध्ये हा पक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
क्रिकेटपटू नितीश कुमार : तोच दुसरीकडे अमेरिकेचा क्रिकेटपटू नितीश कुमारनं क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिलीय. त्याला कारण म्हणजे सध्या अमोरिकेत सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नितीशनं आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 5 धावा करायच्या होत्या, तेव्हा नितीशनं हरिस रौफचा चेंडूवर चौकार मारला. या चौकारामुळंच हा सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचू शकला. नितीशनं 100 च्या स्ट्राइक-रेटनं नाबाद 14 धावा केल्या, ज्यात एक चौकार समाविष्ट आहे. हा सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरची झाली, ज्यात अमेरिकन संघानं पाकिस्तानचा पराभव केला. अमेरिकेचा पाकिस्तानविरुद्धचा हा पहिलाच विजय ठरला.
दोनदा बदलला संघ : बिहारचे नितीश कुमार यांच्यावर ते नेहमी युती बदलतात अशी टीका होत असेत. हा क्रिकेटपटू नितीश कुमारही संघ बदलण्यात माहीर आहे. नितीशनं अंडर-15 स्तरावर अमेरिका आणि नंतर कॅनडासाठी क्रिकेट खेळलं. यानंतर तो कॅनडाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यातही यशस्वी ठरला. फेब्रुवारी 2010 मध्ये नितीशनं अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी नितीशचं वय 15 वर्षे 273 दिवस होतं. त्यावेळी नितीश हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तिसरा सर्वात तरुण खेळाडू होता.
सर्वात तरुणपणी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे खेळाडू :
- 14 वर्षे 233 दिवस- हसन रझा, पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, क्वेटा 1996
- 15 वर्षे 116 दिवस- मोहम्मद शरीफ, बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे 2001
- 15 वर्षे 212 दिवस- गुलशन झा नेपाळ विरुद्ध यूएसए, अल अमिराती 2021
- 15 वर्षे 258 दिवस- गुरदीप सिंग, केनिया विरुद्ध अफगाणिस्तान, शारजाह 2013
- 15 वर्षे 273 दिवस- नितीश कुमार, कॅनडा विरुद्ध अफगाणिस्तान, शारजाह 2010