लाहोर PSL 2025 Draft : पाकिस्तानातील लोकप्रिय T20 लीग पाकिस्तान सुपर लीग (PSL) च्या पुढील हंगामासाठीचा ड्राफ्ट 11 जानेवारी रोजी पाकिस्तानातील ग्वादर इथं आयोजित केला जाणार होता. मात्र, परदेशी प्रशिक्षकांना इथपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी आणि दहशतवादाचा धोका लक्षात घेऊन पीएसएल ड्राफ्ट 2025 पुढं ढकलण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (पीसीबी) तारीख आणि स्थळ बदललं आहे. आता ड्राफ्टसाठी पाकिस्तानातील आणखी एक शहर निश्चित करण्यात आलं आहे. PSL ड्राफ्टमध्ये अनेक प्रसिद्ध खेळाडू आहेत जे पाकिस्तानच्या या T20 लीगमध्ये खेळताना दिसतील.
ग्वादरला दहशतवादाचा फटका बसला : ग्वादर हे पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील एक शहर आणि बंदर आहे. या भागात अनेकदा दहशतवादी हल्ले होतात. अशा परिस्थितीत पीएसएल ड्राफ्टसाठी इथं येणाऱ्या परदेशी प्रशिक्षकांच्या सुरक्षेचा विचार करुन हे पाऊल उचलण्यात आलं आहे. याशिवाय इथं जाण्यासाठी योग्य साधन आणि विमानतळाचाही अभाव आहे. उल्लेखनीय म्हणजे अमेरिकन सरकार इथं प्रवास न करण्याचा सल्ला देत आहे. त्याच वेळी, यूके सरकार पूर्णपणे आवश्यक असल्याशिवाय येथे प्रवास न करण्याचा सल्ला देत आहे.