नवी दिल्ली Team India Next Test :भारतीय क्रिकेट संघानं नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली. ज्यात भारतीय संघाला 1-3 नं पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या मालिकेतील पराभवामुळं भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. यानंतर आता भारतीय संघ पुढचा कसोटी सामना कधी आणि कोणाविरुद्ध खेळणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून आहे.
भारताचा लाजिरवाणा पराभव :कांगारुंविरुद्धची कसोटी मालिका भारतीय चाहत्यांसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. या मालिकेत टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू फ्लॉप होताना दिसले. मालिकेत खराब फॉर्ममुळं कर्णधार प्लेइंग 11 मधून बाहेर झाल्याचं चाहत्यांनी पाहिलं. जसप्रीत बुमराह हा एकमेव खेळाडू होता ज्यानं या मालिकेत चमकदार कामगिरी केली आणि टीम इंडियाच्या पराभवानंतरही त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आलं. यासह टीम इंडियानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलमध्ये आपले सर्व सामने खेळले आहेत.
कधी होणार भारताचा सामना : भारतीय संघाचे खेळाडू आता काही महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढील चक्रात उतरणार आहे. जिथं 20 जूनपासून कसोटी मालिकेचं आयोजन केलं जाईल. ही कसोटी मालिका इंग्लंड संघाविरुद्ध खेळली जाणार आहे. या मालिकेत एकूण पाच सामने खेळवले जाणार आहेत. जे 20 जून ते 04 ऑगस्ट दरम्यान खेळवले जाणार आहे. ही मालिका WTC 2025-27 सायकलचा भाग असेल. या मालिकेसाठी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.