सिडनी WTC Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना जुनमध्ये खेळवला जाणार आहे. या शानदार सामन्यासाठी दोन संघ पात्र ठरले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात खेळल्या गेलेल्या सिडनी कसोटी सामन्यानंतर अंतिम फेरीसाठीचे दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. हे संघ दुसरे कोणी नसून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आहेत. या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू न शकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
WTC बद्दल संपूर्ण माहिती :वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी 9 संघांमध्ये अनेक कसोटी मालिका खेळल्या गेल्या. त्यानंतर अव्वल दोन संघांनी अंतिम फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं आधीच अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं होतं. ऑस्ट्रेलियन संघानं भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सिडनी कसोटी सामन्यात 6 गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना 11 जूनपासून लंडनमधील लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन संघानं सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 मध्ये भारताची कामगिरी : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ची सुरुवात टीम इंडियानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेनं केली होती. भारतीय संघानं ही मालिका 1-0 अशी जिंकली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेली 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. यानंतर भारताचा सामना इंग्लंडशी झाला. टीम इंडियानं ही मालिका 4-1 नं जिंकली. यानंतर 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतही बांगलादेशचा 2-0 असा पराभव झाला. मात्र त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 0-3 असा पराभव पत्करावा लागला आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही 1-3 नं पराभव पत्करावा लागला.
भारताशिवाय प्रथमच होणार WTC फायनल :टीम इंडियानं 2021 आणि 2023 मध्ये फायनल खेळली होती. टीम इंडिया WTC फायनल न खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. WTC 2021 चा अंतिम सामना न्यूझीलंडनं जिंकला होता आणि 2023 चा अंतिम सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला होता. यावेळी ऑस्ट्रेलियन संघाला सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. त्यांचा संघ सध्याचा चॅम्पियन आहे, पण दक्षिण आफ्रिकेचा असल्यानं त्यांना जिंकणं सोपं जाणार नाही. WTC च्या या चक्रात ऑस्ट्रेलियन संघाला अजून एक कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळली जाईल, पण या मालिकेचा गुणतालिकेवर आणि अंतिम सामन्याच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही.
हेही वाचा :
- टीम इंडियाची राजवट संपुष्टात... दशकानंतर गमावली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी; कांगारुंचा मोठा विजय
- 4,4,4,4... जैस्वालची 'यशस्वी' खेळी, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच मोठा रेकॉर्ड