मुंबई IPL 2025 Schedule :इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या पुढील हंगामाशी संबंधित एक खूप मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएल 2025 मार्चपासून सुरु होत आहे. मात्र त्याचं वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही. बीसीसीआय आज (रविवार, 16 फेब्रुवारी) आयपीएल 2025 चं वेळापत्रक जाहीर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगातील या सर्वात मोठ्या टी-20 क्रिकेट लीगच्या पुढील हंगामाचं वेळापत्रक रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता प्रसिद्ध होणार आहे.
आयपीएल 2025 चं वेळापत्रक रविवारी संध्याकाळी होणार जाहीर : क्रिकेट चाहते आयपीएल 2025 च्या वेळापत्रकाची आतुरतेनं वाट पाहत होते आणि ही प्रतीक्षा आता संपणार आहे. 10 संघ पुन्हा एकदा जेतेपदासाठी झुंजताना दिसतील. वेळापत्रक जाहीर होताच चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण पाहू शकतील. तसंच त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अॅपवर असेल.
10 संघ खेळणार स्पर्धा :पुन्हा एकदा आयपीएल 2025 मध्ये दहा संघांमध्ये जेतेपदाचा सामना होणार आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांचा समावेश आहे.
कोणत्या संघात होणार पहिला सामना : आयपीएल 2025 च्या वेळापत्रकाची घोषणा होण्यापूर्वी, या हंगामातील पहिला सामना 21 मार्च रोजी गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. सुरुवातीचा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स इथं खेळवला जाण्याची अपेक्षा आहे. तर 25 मे रोजी या ऐतिहासिक मैदानावर अंतिम सामनाही खेळवण्यात येईल.
केकेआरच्या कर्णधाराची लवकरच घोषणा : या हंगामात चेन्नईचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड करेल तर मुंबईचं नेतृत्व हार्दिक पंड्या करेल. श्रेयस अय्यर पंजाब किंग्जमध्ये गेल्यानंतर, केकेआरनं अद्याप कर्णधाराची घोषणा केलेली नाही. आरसीबीचं नेतृत्व फाफ डु प्लेसिसऐवजी रजत पाटीदारकडे असेल. गेल्या वर्षी मेगा लिलाव झाला होता, त्यामुळं आयपीएल 2025 ची आतुरतेनं वाट पाहिली जात आहे. या लिलावात ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंतला लखनऊ सुपर जायंट्सनं विक्रमी 27 कोटी रुपयांना खरेदी केलं. ऋषभ पंतला नुकतंच लखनऊचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं.
हेही वाचा :
- IPL 2025 पूर्वी मुंबई इंडियन्स संघात मोठा बदल; 23 वर्षीय खेळाडूचा संघात समावेश
- पहिल्या सामन्यातील पराभवानंतर गुजरात विजयी मार्गावर परतणार? फुकटात GGW vs UPW मॅच 'इथं' पाहा लाईव्ह