बेंगळुरु WPL Auction 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामापूर्वी म्हणजेच 2025 मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या आधी, 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात एक मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता. ज्यात सर्व 10 फ्रँचायझींनी भारतीय आणि परदेशी खेळाडूंचा आपल्या संघात समावेश करण्यासाठी प्रयत्न केले. आता महिला प्रीमियर लीगचा तिसरा सीझन म्हणजेच WPL 2025 मध्ये खेळवला जाणार आहे, त्याआधी एक मिनी लिलाव आयोजित केला जाईल, ज्यात अनेक मोठ्या खेळाडूंच्या संघात बदल होतील असं मानलं जातं. महिला प्रीमियर लीगमध्ये सध्या एकूण 5 संघ खेळतात, ज्यात 18 खेळाडूंचा संघ आहे. दरम्यान, आता महिला खेळाडू लीगच्या मिनी लिलावाची तारीख समोर आली आहे.
डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामाचा लिलाव कधी होणार :ईएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या वृत्तानुसार, महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी मिनी लिलाव बेंगळुरुमध्ये 15 डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी प्रत्येक संघाला 15 कोटींची पर्स मिळणार आहे. ज्यात कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंची नावं लिलावापूर्वीच जाहीर करण्यात आली आहेत. जर आपण मिनी लिलावाबद्दल बोललो तर, भारताच्या स्नेह राणा, पूनम यादव आणि वेदा कृष्णमूर्ती हे स्टार खेळाडूंमध्ये असतील. याशिवाय विदेशी खेळाडूंमध्ये ली ताहुहू, हीदर नाइट आणि डिआंड्रा डॉटिन यांचा समावेश आहे. सर्व 5 संघ त्यांच्या संघात जास्तीत जास्त 6 परदेशी खेळाडूंचा समावेश करु शकतात.