दुबई Hardik Pandya Watch Price : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्यानं पाकिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. भारताकडून हार्दिकनं 8 षटकांत फक्त 31 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तथापि, त्याच्या गोलंदाजीपेक्षा त्याच्या मनगटावर बांधलेल्या घड्याळाची चर्चा जास्त होती, ज्याची किंमत कोटींमध्ये असल्याचं सांगितलं जातंय.
7 करोडचं घड्याळ :हार्दिक पांड्यानं पाकिस्तानविरुद्ध घातलेले घड्याळ रिचर्ड मिलचं राफेल नदाल स्केलेटन डायल एडिशन आहे. या घड्याळाच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय चलनात ते सुमारे 7 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. हार्दिक पांड्या इतक्या महागड्या घड्याळात दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. हेच कारण आहे की चाहत्यांनी हार्दिक पांड्याचं घड्याळ स्क्रीनवर पाहताच त्याची किंमत जाणून घेण्याची उत्सुकता वाढली.
बाबरची विकेट घेताच केला जल्लोष : हार्दिक पांड्या पाकिस्तानविरुद्ध 'रिचर्ड मिले' कडून घेतलेलं एक आलिशान घड्याळ घालून खेळताना दिसला. बाबर आझमला बाद करुन खेळातील पहिली विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करत असताना, यादरम्यान सामना पाहणाऱ्या चाहत्यांना भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडूच्या डाव्या मनगटावर 7 कोटी रुपयांचं लक्झरी घड्याळ दिसलं, त्याच वेळी हार्दिक पांड्याचा चेंडू बाहेरील काठावर गेला आणि तो यष्टींमागे केएल राहुलच्या हातात गेला आणि तो बाद झाला. दरम्यान, विकेटचा आनंद साजरा करताना चाहत्यांना हार्दिक पंड्याच्या हातात रिचर्ड मिल RM27-02 CA FQ टूरबिलन राफेल नदाल स्केलेटन डायल एडिशन दिसला.
पांड्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या 200 विकेट्स :हार्दिक पांड्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध दुसरी विकेट घेताच त्यानं एक मोठी कामगिरी केली. पांड्यानं आता 91 वनडे सामन्यांमध्ये 89 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, आतापर्यंत 50 षटकांच्या स्वरुपात त्याच्या बॅटमधून 1805 धावा आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्यानं 94 विकेट्स घेतल्या आणि 1892 धावा केल्या. तर कसोटीत त्याच्या नावावर 17 विकेट्स आणि 532 धावा आहेत. एकूणच, हार्दिकनं सर्व फॉरमॅटमध्ये 4 हजारांहून अधिक धावा आणि 200 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा :
- विराट कोहली @14000... PAK vs IND सामन्यात दिग्गजांना मागे सोडत बनला जगातील अव्वल फलंदाज
- PAK vs IND सामन्याची क्रेझ... एमएस धोनीनं काम थांबवून पाहिला सामना; 'गदर'मधील 'तारा सिंग'ही उपस्थित