कानपूर WTC Point Table :भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात कानपूरमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसानं व्यत्यय आणला. कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी केवळ 35 षटकांचा खेळ होऊ शकला. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारीही पावसानं कहर केला आहे. परिणामी दुसऱ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. तसंच कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 59 टक्के पाऊस पडू शकतो.
कानपूर कसोटी वाहून गेल्यास भारताचं किती नुकसान : कानपूर कसोटीत दुसऱ्या दिवसाप्रमाणेच तिसरा दिवसही पावसात वाहून गेल्यास सामन्याचा निकाल लागणं अशक्य होईल. अशा परिस्थितीत भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये होणारा हा दुसरा कसोटी सामनाही अनिर्णित राहू शकतो. कानपूर कसोटी सामना अनिर्णित राहिल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताचं मोठं नुकसान होऊ शकतं.
डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये काय घडेल : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (2023-2025) च्या चालू चक्रात भारतानं आतापर्यंत 10 पैकी 7 कसोटी सामने जिंकले आहेत. भारताला आतापर्यंत केवळ 2 कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. भारताची विजयाची टक्केवारी 71.67 आहे. कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्यास भारताला बांगलादेशसोबत गुण शेअर करावे लागणार आहेत. या स्थितीत भारत आणि बांगलादेशला 4-4 गुण सामायिक करावे लागतील. भारतानं कानपूर कसोटी जिंकल्यास त्यांचे 12 गुण होतील. म्हणजेच कसोटी सामना अनिर्णित राहिल्यास भारताला 8 गुणांचं नुकसान सहन करावं लागेल.
भारताला 68.18 टक्के गुण राहतील शिल्लक : कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्यास भारताला 68.18 टक्के गुण शिल्लक राहतील. त्याचवेळी, कसोटी सामना जिंकल्यास, भारतीय संघाचे 74.24 टक्के गुण होतील. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीचे तिकीट मिळविण्यासाठी, भारताला 9 पैकी 5 कसोटी सामने जिंकावे लागतील. बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीनंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी सामने (होम) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 कसोटी सामने (अवे) खेळायचे आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत जाण्यासाठी भारताला कानपूर कसोटीसह 9 पैकी 5 कसोटी सामने जिंकावे लागतील.
WTC फायनल खेळण्यासाठी भारत प्रबळ दावेदार : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कसोटी क्रिकेट विश्वचषक अर्थात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 11 जून 2025 रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. जो संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं विजेतेपद जिंकतो त्याला टेस्ट गदा दिली जाते. जागतिक कसोटी विजेतेपद जिंकणं हा कोणत्याही देशासाठी अभिमानाचा क्षण असतो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं या वर्षी जूनमध्ये T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावलं आहे. आता भारतीय संघाचं पुढील मोठं लक्ष्य 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणं आणि हे विजेतेपद जिंकणं आहे.
हेही वाचा :
- भारत-बांगलादेश मालिकेदरम्यान युवा खेळाडूचा भीषण अपघात; BCCI करणार मोठी कारवाई? - Car Accident of Indian Cricketer
- कानपूर कसोटी: दुसऱ्या दिवशी बांगलादेशच्या फलंदाजांनी नव्हे तर 'इंद्रदेवां'नी केली बॅटींग - IND vs BAN 2nd Test