अमरावती : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. दरम्यान, अचलपूरचे आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बच्चू कडू यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघात आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध असलेल्या शिवसेना (उबाठा) बंडखोर अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. बच्चू कडू रविवारी (17 नोव्हेंबर) सायंकाळी बडनेरा येथं प्रीती बंड यांच्या समर्थनात जाहीर सभा देखील घेणार आहेत.
बच्चू कडू जुने शिवसैनिक : प्रहार पक्षाच्यावतीनं अमरावती महानगर प्रमुख बंटी रामटेके आणि प्रीती बंड यांच्यावतीनं बडनेरा मतदारसंघातील माजी आमदार ज्ञानेश्वर धाने यांनी पत्रकार परिषद घेऊन बच्चू कडू यांनी प्रीती बंडे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याची घोषणा केली. "बच्चू कडू हे जुने शिवसैनिक आहेत. शिवसेनेचे दिवंगत नेते माजी आमदार संजय बंड आणि मी आमदार असताना बच्चू कडू शिवसेनेत होते. बच्चू कडूंचे संजय बंड यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. जुने शिवसैनिक असणारे बच्चू कडू यांनी कुठलीही अपेक्षा न बाळगता प्रीती बंड यांना पाठिंबा जाहीर केला," अशी माहिती ज्ञानेश्वर धाने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
रविवारी बडनेरात जाहीर सभा : "प्रीती बंड यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू हे रविवारी सायंकाळी सहा वाजता बडनेरा नवी वस्ती येथील आठवडी बाजार चौक येथं जाहीर सभा घेणार आहेत. बडनेरा विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनता स्वतःच्या खिशातील पैसे जमा करून प्रीती बंड यांच्या पाठीशी उभी झाली. शिवसैनिक देखील प्रीती बंड यांनाच साथ देणार," असं ज्ञानेश्वर धाने म्हणाले.
हेही वाचा