पणजी (गोवा) - मनोज बाजपेयीची मुख्य भूमिका असलेल्या 'डिस्पॅच' चित्रपटाची 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. कनू बहल दिग्दर्शित 'डिस्पॅच'मध्ये शहाना गोस्वामी आणि अर्चिता अग्रवाल यांच्याही भूमिका आहेत. ही कथा एका शोध पत्रकार जॉयच्या जीवनाभोवती फिरते. ही भूमिका मनोज बाजपेयी यांनी साकारली आहे. झी 5 ची निर्मिती असलेल्या 'डिस्पॅच' बरोबरच त्यांचा 'विकटकवी' हा चित्रपटही 'इफ्फी'मध्ये दाखवण्यात येणार आहे.
'विकटकवी: द क्रॉनिकल्स ऑफ अमरगिरी' हा चित्रपट प्रदीप मदली यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 1970 च्या तेलंगणाच्या भूमीत घडलेला एक गुप्तहेर थ्रिलर आहे. यातील गुप्तहेराची भूमिका नरेश अगस्त्य यांनी साकारली असून याचा नायक रामकृष्ण हा नल्लमल्ला जंगलातील गूढ प्रकरणांची चौकशी करतो. यामध्ये इतिहास, राजकारण आणि सस्पेन्स यांचे मिश्रण पाहायला मिळणार आहे. यात मेघा आकाशने राजकुमारी लक्ष्मीची भूमिका साकारली आहे.
'डिस्पॅच' या चित्रपटाची निर्मिती झी5 ओरिजनलने केली आहे. या चित्रपटाची वर्णी 'इफ्फी'मध्ये लागल्याबद्दल दिग्दर्शक कनू बहल यांनी उत्साह व्यक्त केला. "इफ्फीमध्ये डिस्पॅच घेऊन जाण्यासाठी आणि चित्रपट रसिकांमध्ये दाखविण्यासाठी आम्ही खूप उत्सुक झालो आहोत. पहिल्यांदा स्क्रीनिंग करण्यापेक्षा अधिक चांगली भावना दुसरी नाही. अशा फेस्टिव्हलमध्ये जाणाऱ्यांकडून चित्रपटाबद्दल प्रामाणिक अभिप्राय मिळणार आहे. ही माझी पहिलीच वेळ आहे आणि मी त्यात सहभागी होण्यास उत्सुक आहे., " असं त्यांनी म्हटलंय.
दिग्दर्शक प्रदीप मदली यांनीही 'विकटकवी' चित्रपट इफ्पीत दाखवला जाणार असल्याबद्दल आपला आनंद शेअर करताना म्हटले, "इफ्फीमध्ये 'विकटकवी'चा प्रीमियर होतोय यासाठी मी खूप उत्साहित आहे. इफ्फीसारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर त्यांचे काम दाखवणे कोणत्याही दिग्दर्शकासाठी खरोखरच मोठा सन्मान आहे. विकटकवीची कथा, त्याच्या खोल सांस्कृतिक मुळे आणि गूढ रहस्य, विशेषत: तेलंगणाचा समृद्ध स्थानिक इतिहास जागतिक प्रेक्षकांसमोर आणल्यामुळे मला खूप अभिमान वाटतो. यासाठी झी 5 चे सहकार्य अप्रतिमपणे लाभदायक ठरले आहे आणि मी या विशेष चित्रपटासह इफ्फीला भेट देण्यास उत्सुक आहे. "
20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) 21 नोव्हेंबरला 'डिस्पॅच' हे विशेष सादरीकरण आणि 23 नोव्हेंबरला 'विकटकवी' जागतिक प्रीमियर म्हणून दाखवले जाईल.