अँटिग्वा (वेस्ट इंडिज) WI vs ENG 2nd ODI Live Streaming : इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज 02 नोव्हेंबर (शनिवार) रोजी सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा इथं खेळवला जाईल. शाय होपच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजनं अँटिग्वा इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा आठ गडी राखून पराभव करत मालिकेत दमदार सुरुवात केली आणि 1-0 अशी आघाडी घेतली.
पहिल्या सामन्यात इंग्रजांचा पराभव : गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात स्टँड-इन कर्णधार लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम कुरन यांच्या चमकदार खेळी असूनही, यजमानांनी इंग्लंडला 209 धावांपर्यंत रोखण्यात यश मिळवलं. इंडिजकडून गुडाकेश मोटीनं चार विकेट घेत इंग्लंडला रोखलं. तसंच जेडेन सील्सनंही वेस्ट इंडिजसाठी शानदार गोलंदाजी केली आणि आठ षटकांत 22 धावांत दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनं कोणतंही संकट न येता लक्ष्य गाठलं. एव्हिन लुईसनं 69 चेंडूत 94 धावांची आक्रमक खेळी खेळत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या आक्रमक डावखुऱ्या फलंदाजानं पाहुण्या संघाच्या गोलंदाजीला अडचणीत आणत पाच चौकार आणि आठ मोठे षटकार ठोकले. अशाप्रकारे, यजमानांचा एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन सामन्यातील विजयाचा सिलसिला कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल, तर इंग्लंड संघ या सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करतील. पहिल्या सामन्यात कमी धावसंख्येवर बाद झालेल्या फिल सॉल्ट आणि विल जॅक यांच्याकडून इंग्लंडला मोठ्या खेळीची गरज असेल.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : पहिला वनडे आंतरराष्ट्रीय सामना 1973 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता. यानंतर वनडे सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड एकूण 106 वेळा आमनेसामने आले आहेत. या हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये, इंग्लंडनं चांगली कामगिरी केली आहे, त्यांनी 53 सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजनं 47 सामन्यांमध्ये यश मिळवले आहे. याशिवाय 6 सामन्यांचा निकाल लागला नाही. वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या 48 एकदिवसीय सामन्यांमध्ये यजमान संघाचा वरचष्मा आहे. या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजनं 26 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडनं 18 सामने जिंकले आहेत आणि 4 सामने निकालाशिवाय संपले आहेत.
वनडे मालिकेत कशी कामगिरी : वनडे मालिकेतील वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटला आहे. आतापर्यंत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकूण 22 वनडे मालिका खेळल्या गेल्या आहेत. या कालावधीत दोन्ही संघांनी 9-9 मालिका जिंकल्या आहेत. याशिवाय 4 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. घरच्या मैदानावर खेळताना वेस्ट इंडिजनं इंग्लंडला 6 वनडे मालिकेत पराभूत केलं आहे. तर 3 मालिकेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय 2 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.
खेळपट्टी कशी असेल : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. या खेळपट्टीवर फलंदाजांना खूप मदत मिळते. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणारा संघ चांगली धावसंख्या उभारु शकतो. या खेळपट्टीचा मूड काळानुसार बदलू शकतो आणि फिरकीपटूंना मदत मिळू शकते. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळण्याची शक्यता असते, तर शेवटच्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाज वर्चस्व गाजवू शकतात. या खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग करणं सोपं असल्यानं नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणं पसंत करेल. दुसऱ्या डावात गोलंदाजांच्या अडचणी वाढू शकतात.
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे : 31 ऑक्टोबर (वेस्ट इंडिज 8 विकेटनं विजयी)
- दुसरा वनडे : आज
- तिसरा वनडे : 6 नोव्हेंबर
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दुसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?