अँटिग्वा WI vs BAN 1st Test Live Streaming : वेस्ट इंडीज क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज 22 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा इथं खेळवला जाईल. बांगलादेशनं 2009 मध्ये वेस्ट इंडिजला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केलं होतं. त्यानंतर बांगलादेशला वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव करता आलेला नाही.
विजयी मार्गावर परतण्याचा करेबियन संघाचा प्रयत्न : यजमान वेस्ट इंडिजनं नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मायदेशात कसोटी मालिका 1-0 नं गमावली होती. यानंतर ते बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. त्याचबरोबर बांगलादेशलाही दक्षिण आफ्रिकेकडून नुकत्याच झालेल्या मायदेशातील कसोटी मालिकेत 2-0 अशा पराभवानंतर जोरदार पुनरागमन करायचं आहे. वेस्ट इंडिजचं कर्णधारपद क्रेग ब्रॅथवेटकडे आहे.
कसोटीनंतर होणार वनडे मालिका : दुसरीकडे बांगलादेशची कमान नझमुल हुसेन शांतोकडे असेल. संघाचा अनुभवी खेळाडू मुशफिकुर रहीम हा देखील दुखापतीमुळं या मालिकेत खेळू शकणार नाही. कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन वनडे आणि तीन T20 सामनेही खेळवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत ही कसोटी मालिका दोन्ही संघांना आपली ताकद दाखवण्याची आणि आगामी सामन्यांसाठी आत्मविश्वास वाढवण्याची संधी असेल.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : कसोटी फॉर्मेटमध्ये वेस्ट इंडिजकडे बांगलादेशविरुद्ध महत्त्वपूर्ण आघाडी आहे. उभय संघांमधील 20 कसोटी सामन्यांपैकी वेस्ट इंडिजनं 14 सामने जिंकले आहेत तर बांगलादेशनं 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दोघांमध्ये 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. वेस्ट इंडिजनं या फॉरमॅटमध्ये अधिक यश मिळवलं असून बांगलादेशविरुद्धच्या गेल्या पाचपैकी चार सामने जिंकले आहेत.
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबर (शुक्रवार) पासून सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा इथं भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 07:00 वाजता होईल.