बार्बाडोस T20 World Cup 2024 USA vs WI:आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 चा 46वा सामना बार्बाडोस येथे वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघानं अमेरिकेचा 9 विकेटनं एकतर्फी पराभव केला. सुपर-8 मधील पहिल्या सामन्यात विंडीज संघाला इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, त्यानंतर उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना या सामन्यात मोठा विजय नोंदवणं आवश्यक होतं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेचा संघ 19.5 षटकात 128 धावांपर्यंतच मर्यादित राहिला. प्रत्युत्तरात शाई होपच्या स्फोटक खेळीच्या जोरावर विंडीज संघानं केवळ 1 विकेट गमावून 10.5 षटकात हे लक्ष्य गाठलं.
अमेरिकेची खराब फलंदाजी :अमेरिकेनं प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात सर्वबाद 128 धावा केल्या. यादरम्यान अँड्रिज गॉसनं 16 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 29 धावा, नितीश कुमारनं 19 चेंडूत 20 धावा केल्या. कर्णधार ॲरॉन जोन्स 11 धावा करुन बाद झाला. अमेरिकेच्या डावात वेस्ट इंडिजकडून रसेलनं 3 विकेट घेतले. त्यानं 3.5 षटकात 31 धावा दिल्या. अल्झारी जोसेफनं 4 षटकात 31 धावा देत 2 विकेट घेतले. रोस्टन चेसनं 4 षटकात 19 धावा देत 3 विकेट घेतले.
शाई होपची वादळी खेळी : या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिज संघाला ब्रँडन किंगच्या रुपानं मोठा धक्का बसला. तो अनफिट असल्यामुळं संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळं त्याच्या जागी शाई होपला संघात स्थान दिलं. विंडीज संघाचा हा निर्णय पूर्णपणे योग्य ठरला. 129 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना होप आणि जॉन्सन चार्ल्सच्या जोडीनं वेस्ट इंडिज संघाला शानदार सुरुवात करुन दिली आणि पहिल्या 6 षटकात संघाची धावसंख्या 58 धावांपर्यंत नेली. यानंतर चार्ल्स 14 चेंडूत 15 धावांची खेळी करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर निकोलस पूरन फलंदाजीसाठी आला. पूरन आणि होप या दोघांनी धावांचा वेग अजिबात कमी होऊ दिला नाही. होपनं मोठे फटके खेळणं सुरूच ठेवलं. त्यानं 39 चेंडूत 82 धावांच्या नाबाद खेळीत 8 षटकार आणि 4 चौकार खेचले. होपनं या डावात 210 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. पूरननं 12 चेंडूत 27 धावांची नाबाद खेळी केली.