वेस्ट इंडिज West Indies Squad :पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजनं आपला क्रिकेट संघ जाहीर केला आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. क्रेग ब्रॅथवेटला संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. तसंच संघाचा स्टार फिरकीपटू गुडाकेश मोटी संघात परतला आहे. बांगलादेशविरुद्ध मायदेशात झालेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये तो खेळला नाही कारण तो त्यावेळी ग्लोबल सुपर लीगमध्ये भाग घेत होता. विशेष म्हणजे वेस्ट इंडिजनं यापूर्वी 18 वर्षांआधी पाकिस्तानचा दौरा केला होता.
आमिर जंगूला संघात संधी :यष्टीरक्षक फलंदाज आमिर जंगूचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्यानं गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी दाखवली असून आपल्या खेळानं सर्वांना प्रभावित करण्यात तो यशस्वी ठरला आहे. चार दिवसीय देशांतर्गत टूर्नामेंटमध्ये त्यानं पाच सामन्यांमध्ये 63.50 च्या सरासरीनं दोन शतकं आणि एक अर्धशतकांसह 500 धावा केल्या आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. आमिर जंगूनं नुकतेच बांगलादेशविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. तो कसोटीत पदार्पण करेल अशी शक्यता आहे.
शमर जोसेफ मालिकेतून बाहेर :दुसरीकडे, स्टार वेगवान गोलंदाज शामर जोसेफला कसोटी मालिकेतून बाहेर ठेवण्यात आलं आहे. तो जखमी झाला आहे. याच कारणामुळं तो बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेलाही मुकला आहे. अल्झारी जोसेफचीही कसोटी संघात निवड झालेली नाही. वेस्ट इंडिज संघाला या दोघांची उणीव भासेल.