सेंट लुसिया West Indies Update Squad :वेस्ट इंडिज क्रिकेट संघात इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेदरम्यान दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयानंतर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्याची उत्सुकता वाढली आहे. यजमान वेस्ट इंडिज सध्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेत 0-2 नं पिछाडीवर आहे.
रसेल बाहेर तर निलंबित खेळाडू संघात : वेस्ट इंडिजनं मालिकेच्या मध्यावर संघात केलेला बदल हा पहिल्या दोन T20 सामन्यातील पराभवाचा परिणाम आहे की आणखी काही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आंद्रे रसेलबाबत असं बोललं जात आहे की तो दुखापतीमुळं बाहेर आहे. तसंच अल्झारी जोसेफवर लावण्यात आलेलं निलंबन आता संपुष्टात आल्यानं त्याला संघात परत बोलावण्यात आलं आहे.
अल्झारीवरील 2 सामन्यांची बंदी उठवली : अल्झारी जोसेफवर 2 सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळंच तो मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांतून बाहेर राहिला. आता त्याला शेमार जोसेफच्या जागी संघात स्थान मिळालं आहे. आंद्रे रसेलच्या डाव्या घोट्याला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळंच तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित 3 सामने खेळणार नाही. त्याच्या जागी अष्टपैलू शमर स्प्रिंगरचा संघात समावेश करण्यात आला आहे. शमर स्प्रिंगर अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या T20 मालिकेत खेळताना दिसला होता.