बेंगळुरू Virat Kohli :या वर्षी जूनमध्ये अमेरिका तसंच वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी विराट कोहलीच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यावर विराट कोहलीनं मोठं वक्तव्य केलं आहे. 'मी अजूनही या फॉरमॅटमध्ये खेळण्यास सक्षम' असल्याचं त्यानं म्हटलं आहे. मुलाच्या जन्मामुळं कोहली दोन महिने क्रिकेटपासून दूर होता. सोमवारी झालेल्या आयपीएल सामन्यात त्यानं 49 चेंडूत 77 धावा केल्या. ज्यामुळं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) पंजाब किंग्जला हरवून सामना आपल्या नावावर केला. यावेळी कोहलीला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
खेळण्यात सुधारणा कराव्या लागतात :सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला, 'मला माहीत आहे की आजकाल, जेव्हा-जेव्हा टी-20 क्रिकेटचा विषय येतो, तेव्हा माझं नाव क्रिकेटच्या प्रचारासाठी जोडलं जातं. पण तरीही मी त्यासाठी सक्षम आहे. मला त्यासाठी काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. पण टी-20 फॉरमॅटमध्ये खेळात सुधारणा करण्याची गरज आहे', असं कोहलीनं म्हटलं आहे. 'तुम्हाला तुमच्या खेळात नेहमी काहीतरी नवीन करावं लागतं. लोकांना माहीत आहे की, मी कव्हर ड्राईव्ह चांगलं खेळतो. त्यामुळं ते मला रिकाम्या जागेत शॉट्स मारू देत नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्हाला एक धोरण तयार करावं लागतं. तसंच तुमच्या खेळण्यात सतत सुधारणा कराव्या लागतात.