नवी दिल्ली Virat Kohli Bowling : विराट कोहलीच्या नावावर क्रिकेटमधील फलंदाजीचे अनेक विक्रम आहेत. पण गोलंदाजीत त्याच्या नावावर विश्वविक्रम असेल तर नवलच कारण तो फार क्वचित प्रसंगी गोलंदाजी करतो. तथापि, कधीकधी तो कसोटी, एकदिवसीय किंवा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट म्हणजे T20 मध्ये, विराट कोहलीनं एकदा असे काही आश्चर्यकारक केलं जे जगातील कोणत्याही गोलंदाजानं विराटच्या आधी किंवा नंतर केलं नाही.
विक्रम करणारा एकमेव गोलंदाज : विराट कोहली हा जगातील एकमेव असा गोलंदाज आहे, ज्यानं T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैध चेंडू टाकण्यापूर्वीच खेळाडूला बाद केलं आहे. म्हणजेच त्याला अशा चेंडूवर विकेट मिळाली जो पंचांनी वैध घोषित केला नाही. ही अनोखी घटना केव्हा घडली हे तुम्हाला माहीत आहे का? 2011 मध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता आणि त्यादरम्यान दोन्ही संघांमध्ये T20 मालिकाही खेळली गेली होती.
विराटनं केली गोलंदाजी : 31 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या या मालिकेतील एका सामन्यात विराट कोहलीनं गोलंदाज म्हणून विश्वविक्रम केला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराट कोहलीनं 3 षटकं टाकली आणि 22 धावांत एक विकेट घेतली. जेव्हा धोनीनं विराटकडे बॉलिंगसाठी बॉल सोपवला तेव्हा त्याला डावातील 8वं षटक टाकायचं होतं. डावातील हे 8वं षटक असलं तरी या सामन्यातील विराटचं पहिलंच षटक होतं.