कानपूर Virat Kohli Record : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सामन्यागणिक नवनवीन विक्रम करत आहे. आता कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. हा टप्पा गाठणारा भारताचा सचिन तेंडुलकर पहिला असला तरी आता विराट कोहली त्याच्याही पुढं गेला आहे. कारण हे लक्ष्य त्यानं सर्वात जलद गाठलं आहे. हा पराक्रम सचिन तेंडुलकरच्या तुलनेत खूपच कमी डावात केला आहे.
सचिन तेंडुलकरच्या खूप पुढे कोहली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावा पूर्ण करणारा सचिन तेंडुलकर पहिला खेळाडू होता. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 623 डाव लागले. आता कोहलीबाबत बोलायचं झालं तर त्यानं केवळ 594 डावांत 27 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. म्हणजे सचिन तेंडुलकरच्या आधी 29 डाव. आतापर्यंत जगात फक्त तीनच फलंदाज आहेत जे इतक्या धावा करु शकले, आता कोहली चौथा फलंदाज म्हणून या क्लबमध्ये दाखल झाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू :
- सचिन तेंडुलकर - 34357
- कुमार संगकारा - 28016
- रिकी पाँटिंग - 27483
- विराट कोहली - 27000*
विराट कोहलीची कारकीर्द : विराट कोहलीनं 114 कसोटी सामन्यांच्या 193 डावांमध्ये 48.74 च्या सरासरीनं 8871 धावा केल्या आहेत. यात विराटनं 7 द्विशतकं, 29 शतकं आणि 30 अर्धशतकं केली आहेत. विराट कोहलीचा कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या 254 धावा आहे. त्यानं 295 एकदिवसीय सामन्यांच्या 283 डावांमध्ये 58.18 च्या सरासरीनं 13906 धावा केल्या आहेत. या काळात विराटनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतकं आणि 72 अर्धशतकं केली आहेत. याशिवाय T20 मध्ये विराटनं 125 सामन्यांच्या 117 डावांमध्ये 48.7 च्या सरासरीनं 4188 धावा केल्या आहेत. विराटनं T20 मध्ये 38 अर्धशतक आणि 1 शतक झळकावलं आहे.
कोहलीचं अर्धशतक हुकलं : विराट कोहलीनं आपल्या 27 हजार धावा नक्कीच पूर्ण केल्या आहेत. तोही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता, पण त्याला आपले अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. बांगलादेशविरुद्ध आज कानपूरमध्ये कोहलीनं 35 चेंडूत 47 धावांची खेळी केली. यादरम्यान त्यानं चार चौकार आणि एक गगनभेदी षटकार लगावला.
हेही वाचा :
- रोहित-यशस्वीनं कसोटीला बनवलं T20, अवघ्या 3 षटकांत ठोकल्या 50 धावा; भारतानं बनवला विश्वविक्रम - Fastest 50 and 100 Runs in Test
- कानपूरमध्ये रवींद्र जडेजाचं 'त्रिशतक'; दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान - Ravindra Jadeja 300 Wickets