दुबई Virat Kohli 14000 Runs in ODI : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. विराटनं एका खास यादीत जगातील सर्व फलंदाजांना मागे टाकलं आहे. त्यानं एक असा विक्रम केला आहे जो आतापर्यंत सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याला 'क्रिकेटचा देव' असं म्हटलं जातं.
विराट कोहलीची ऐतिहासिक कामगिरी :पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात 15 धावा करुन विराट कोहलीनं वनडे क्रिकेटमध्ये आपले 14000 धावा पूर्ण केल्या आहेत. विराट हा जगातील फक्त तिसरा फलंदाज आहे ज्यानं वनडे क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा आकडा गाठला आहे. विराटच्या आधी सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा यांनी ही कामगिरी केली आहे. पण विराट कोहलीनं वनडे सामन्यात सर्वात जलद 14000 धावा पूर्ण केल्या आहेत. सचिन तेंडुलकरनं 359 व्या सामन्यातील 350 व्या डावात ही कामगिरी केली. तर, विराट कोहलीनं 299 व्या सामन्यातील 287 व्या डावात हा कारनामा केला आहे.
विराट कोहली तिसऱ्या स्थानावर : विशेष म्हणजे विराट कोहलीच्या आधी सचिन तेंडुलकरनंही पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात वनडे सामन्यात 14000 धावा पूर्ण केल्या होत्या. सचिननं 6 फेब्रुवारी 2006 रोजी पेशावर इथं ही कामगिरी केली होती. आता, विराट कोहलीनं दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्ध हाच पराक्रम पुन्हा केला आहे. वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. कुमार संगकारा 14234 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि सचिन 18426 धावांसह पहिल्या स्थानावर आहे.