पॅरिस - कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टनं (CAS) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या फायनलमधील अपात्रतेविरुद्धचे विनेश फोगटचं अपील फेटाळलं आहे. कुस्तीपटू विनेश फोगाटचं 100 ग्रॅम वजन जास्त आढळल्यामुळे ती अंतिम फेरीसाठी अपात्र झाली होती. अशा स्थितीत तिच्याकडून कांस्यपदक पदक काढून घेतल्यानंतर तिनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये (CAS) अपील दाखल केलं. त्यावर सीएएसनं निकाल देताना विनेशच्या ऑलिम्पिक अपात्रतेवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे विनेशला कोणतेही पदक मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA) अध्यक्षा डॉ. पीटी उषा यांनी फोगटचा युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) विरुद्धचा अर्ज फेटाळण्याच्या CAS च्या निर्णयानं धक्का बसल्याच म्हटलं आहे. तसेच त्यांनी सीएएसच्या निकालावर निराशा व्यक्त केली आहे.
पीटी उषा यांनी म्हटले,"आमच्या कायदेशीर प्रतिनिधींनी क्रीडा लवादासमोर त्यांच्या सबमिशनमध्ये योग्यरित्या माहिती दिली. विनेशचा समावेश असलेल्या प्रकरणामुळे खेळाडूंना, विशेषत: महिला खेळाडूंना, शारीरिक आणि मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागते. त्यामधून कठोर आणि अमानुष नियम असल्याचं अधोरेखित झालं आहे. खेळाडूंना प्राधान्य देणाऱ्या अधिक न्याय्य आणि वाजवी नियमांची गरज आहे."
- केवळ 100 ग्रॅम वजन जास्त आढळल्यानं विनेश फोगाटला पदकाला मुकावं लागलं आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमधील नियमांबाबतच जगभरातील खेळाडुंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुसरीकडं विनेश फोगाटनं कुस्तीमधून यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली आहे.