वडोदरा Varun Chakaravarthy 5 Wickets : विजय हजारे ट्रॉफीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये वरुण चक्रवर्तीनं शानदार गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी राजस्थानचा डाव फक्त 267 धावांवर रोखला. एकेकाळी राजस्थान संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता पण चक्रवर्तीच्या गूढ फिरकीसमोर संघ चांगलाच अडचणीत आला. वरुण चक्रवर्तीनं एकट्यानं राजस्थानचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. या उजव्या हाताच्या फिरकी गोलंदाजानं फक्त 52 धावा देऊन 5 बळी घेतले. आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर वरुणनं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याचा दावा केला आहे.
वरुणची 'चक्रवर्ती' खेळी :वरुण चक्रवर्तीनं हरियाणाच्या अभिजीत तोमर, महिपाल लोमरोर, दीपक हुड्डा यांना बाद केलं. याशिवाय त्यानं अजय सिंगची विकेटही घेतली. यानंतर खलील अहमदची विकेट घेऊन त्यानं आपल्या पाच विकेट पूर्ण केल्या. तत्पुर्वी हरियाणा संघाचा कर्णधार महिपाल लोमरोर आणि सलामीवीर अभिजीत तोमर यांनी एकदा शतकी भागीदारी केली होती पण त्यानंतर वरुण चक्रवर्तीनं ही भागीदारी तोडली. यानंतर, त्यानं दीपक हुड्डाला 7 धावांवर बाद केलं आणि शतकवीर अभिजीत तोमरलाही वरुण चक्रवर्तीनं बाद केलं.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केली दावेदारी : वरुण चक्रवर्तीसाठी या पाच विकेट्स खूप महत्त्वाच्या ठरु शकतात. कारण असं वृत्त आहे की या खेळाडूची चॅम्पियन्स ट्रॉफी संघात निवड होऊ शकते. 11 जानेवारी रोजी भारतीय संघ निवड समिती आणि गंभीर-रोहित यांच्यात एक बैठक होणार आहे. ज्यात इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय, T20 मालिकेसाठी तसंच चॅम्पियन्स ट्रॉफी संघाची निवड केली जाऊ शकते. यात वरुण चक्रवर्तीची निवड होऊ शकते. कुलदीप यादव अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. वरुण चक्रवर्तीचा फॉर्मही उत्कृष्ट आहे, त्यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 18 विकेट्स घेतल्या आहेत. आता निवडकर्ते त्याच्यावर विश्वास दाखवतात की नाही हे पाहणं बाकी आहे.
वरुण चक्रवर्तीची कारकीर्द कशी : वरुण चक्रवर्तीनं टीम इंडियासाठी 13 T20 सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत. पण त्यानं अद्याप वनडेमध्ये पदार्पण केलेलं नाही. हा उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज या फॉरमॅटमध्येही चमत्कार करु शकतो. चक्रवर्तीनं आतापर्यंत 23 लिस्ट ए सामन्यांमध्ये 59 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात त्यानं चार सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेतल्या आहेत. वरुणच्या या कामगिरीमुळं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचा दावा मजबूत होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
हेही वाचा :
- मराठमोळा क्रिकेटपटू करणार भाजपामध्ये प्रवेश? 'त्या' एका भेटीनं रंगली चर्चा
- 'बायकोनं सांगितलं...' इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार सूर्या पत्नीसह साई चरणी लीन; दर्शनानंतर काय म्हणाला?