मुंबई Team India Squad for Border Gavaskar Trophy :ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघाच्या निवडीमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे मोहम्मद शमीची संघात निवड करण्यात आलेली नाही, जो अलीकडंच बेंगळुरु कसोटीनंतर सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासह गोलंदाजी करताना दिसला होता. शमी स्वत: सोशल मीडियावर सतत तंदुरुस्त असल्याच्या पोस्ट करुन व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळं त्याची निवड का झाली नाही अशी चर्चा क्रिकेटविश्वात सुरु आहे.
18 सदस्यीस संघाची घोषणा : भारतानं 22 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पाच कसोटी सामन्यांच्या दौऱ्यासाठी आपल्या 18 सदस्यीय संघात अभिमन्यू ईश्वरन, वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी या तीन नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे. BCCI नं दिलेल्या माहितीनुसार, मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि खलील अहमद यांना प्रवासी राखीव म्हणून संघात समाविष्ट केलं जाईल.
अभिमन्यू ईश्वरन ऑस्ट्रेलियात करणार पदार्पण : या मालिकेत रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करेल आणि जसप्रीत बुमराह उपकर्णधार असेल, रोहित वैयक्तिक कारणांमुळं पहिल्या दोन कसोटींपैकी एकाला मुकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत 29 वर्षीय अभिमन्यू या दौऱ्यावर कसोटीत पदार्पण करु शकतो. तो 2022 मध्ये बांगलादेशमध्ये भारताच्या कसोटी संघाचा एक भाग होता. ईश्वरन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्यानं दुलीप ट्रॉफीमध्ये दोन शतकं, इराणी ट्रॉफीमध्ये आणखी एक शतक झळकावलं आणि बंगालसाठी शतकासह रणजी ट्रॉफी हंगामाची सुरुवात केली.
अश्विन, जडेजा आणि सुंदर हे भारतीय संघातील 3 फिरकी अष्टपैलू खेळाडू : भारतानं आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या तीन फिरकी अष्टपैलू खेळाडूंची निवड केली आहे. 21 वर्षीय नितीश कुमार रेड्डी हा ऑस्ट्रेलिया संघातील एकमेव सीम-बॉलिंग अष्टपैलू खेळाडू आहे. मॅके आणि मेलबर्न इथं दोन चार दिवसीय सामने खेळणाऱ्या भारत अ संघाचा तो भाग असल्यानं त्याला जुळवून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल. रेड्डी, ज्यानं या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्ध T20 पदार्पण केलं आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी कसोटी संघात राखीव खेळाडू होता, तो आधीच ऑस्ट्रेलियात आहे.