नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून भाजपा राज्यातील मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले असून फेरमतमोजणी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसंच काही मतदारसंघात मृत व्यक्तींच्या नावानं देखील मतदान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अशातच शिवसेना (उबाठा) पक्षाकडून पराभूत झालेले नाशिक पश्चिमचे उमेदवार सुधाकर बुडगुजर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे.
5 टक्के फेरमतमोजणी करता येणार : विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकाला विरोधात नाशिकमधील शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. सुधाकर बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या पाच टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. प्रति बूथ 40 हजार आणि 18 टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 टक्के केंद्रांची फेरमतमोजणी करता येणार आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शर्मा यांनी बडगुजर यांना सूचनापत्र दिलं आहे.
उमेदवारांना मिळाली एवढी मतं : नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार सीमा हिरे विजय झाल्या असून त्यांना 1 लाख 41 हजार 725 मते मिळाली, तर शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना 73 हजार 548 मतं मिळाली. मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांना 46 हजार 649 मतं मिळाली होती.
"आम्हाला झालेल्या मतदानाच्या स्लीपा मोजायच्या आहेत, मात्र निवडणूक निर्णय अधिकारी आम्हाला गुमराह करत आहेत. व्हीव्हीपॅटमध्ये ज्या स्लीपा आहेत, त्या मोजण्यासाठी आम्हाला परवानगी त्यांनी द्यावी." असं शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे.
ईव्हीएम व्हीव्हीपॅट 45 दिवस सीलबंद : विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सील करून गोडावूनमध्ये ठेवण्यात आली आहेत. ही यंत्रं आता 45 दिवस सील राहणार आहेत. एखाद्या उमेदवारानं निकालावर आक्षेप घेतल्यास न्यायालयीन प्रक्रियेसाठी 45 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळं राज्यभरातील मतदान यंत्रं 45 दिवसांपर्यंत सील राहणार आहेत. मतदान यंत्रांसह व्हीव्हीपॅट मशीन कंट्रोल युनिट सील करुन ठेवण्यात आली आहेत.
हेही वाचा