अँटिग्वा T20 World Cup 2024 IND vs BAN :भारतानंशनिवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकातील सुपर-8 सामन्यात 50 धावांनी धुव्वा उडवत टीम इंडियानं उपांत्य फेरीचं तिकिट निश्चित केलेय. लागोपाठ दोन पराभवानंतर बांगलादेशचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलंय. बांगलादेशला आधी ऑस्ट्रेलियाकडून आणि आता भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. सुपर-8 मध्ये टीम इंडियानं लागोपाठ दोन सामन्यात विजय मिळवलाय. टीम इंडियाचा सुपर-8 मधील अखेरचा सामना सोमवारी ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे.
भारतीय संघाची फलंदाजी : सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 5 गडी गमावून 196 धावा केल्या. विराट कोहलीनं 28 चेंडूत 37 धावा, ऋषभ पंतनं 24 चेंडूत 36 धावा आणि शिवम दुबेनं 24 चेंडूत 34 धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्मानं 11 चेंडूत 23 धावा केल्या. अखेरीस हार्दिक पंड्यानं 27 चेंडूत नाबाद 50 धावा करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. बांगलादेशकडून वेगवान गोलंदाज तनझिम हसन आणि फिरकी गोलंदाज रिशाद हुसेननं 2-2 विकेट घेतल्या. याशिवाय शाकिब अल हसननं 1 विकेट घेतली.
भारतीय संघानं बांगलादेशसमोर 197 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करता बांगलादेशचा संघ 8 गडी गमावून केवळ 146 धावा करू शकला. बांगलादेश संघासाठी कर्णधार नझमुल हुसैन शांतोनं 32 चेंडूत 40 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. तर तनजीद हसननं 29 आणि रिशाद हुसेननं 24 धावा केल्या. मात्र ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. भारतीय संघाकडून फिरकीपटू कुलदीप यादवनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या.
'हे' 5 खेळाडू ठरले टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार
- हार्दिक पांड्या : हार्दिक पांड्यानं सहाव्या क्रमांकावर शानदार फलंदाजी करत 27 चेंडूत 50 धावा केल्या. त्यानं आपल्या डावात 4 चौकार आणि 3 षटकार मारले. 185.19 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या. यानंतर पांड्यानं गोलंदाजीत कमाल केली. त्यानं टीम इंडियाला पहिला विकेट मिळवून दिला. पंड्यानं लिटन दासला 13 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
- ऋषभ पंत :पंड्यासोबतच ऋषभ पंतनंही फलंदाजीत कमाल केली. पंतनं 24 चेंडूत 36 धावा केल्या. तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. पण 12व्या षटकात खराब स्वीप शॉट खेळून बाद झाला. पंतच्या शानदार फलंदाजीमुळं टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली.
- शिवम दुबे :खराब फॉर्मशी झगडणाऱ्या शिवम दुबेने चांगली फलंदाजी केली. त्यानं 24 चेंडूत 34 धावा करत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं. शिवमनं हार्दिक पांड्याला दुसऱ्या टोकाकडून साथ दिली. त्यानं तीन गगनचुंबी षटकार ठोकले. पंड्या आणि दुबे यांच्यात 53 धावांची भागीदारी झाली.
- कुलदीप यादव : कुलदीप यादवनं गोलंदाजी करताना बांगलादेशची दाणादाण उडविली. कुलदीपच्या जादुई गोलंदाजीनं बांगलादेशचा सलामीवीर तनजीद हसन 29 धावांवर, तौहीद हृदयॉय 4 धावांवर आणि शकीब अल हसनला 11 धावांवर बाद केलं. कुलदीपनं 4 षटकात 19 धावा देत 3 विकेट घेतल्या.
- जसप्रीत बुमराह :बुमराहनं 4 षटकात केवळ 13 धावा दिल्या. तर 2 विकेट घेतल्या. बुमराहनं कर्णधार नजमुल हुसेन शांतोला 40 धावांवर तर रिशाद हुसेनला 24 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या दोन मोठ्या विकेट घेत बुमराहनं बांगलादेशचं कंबरडं मोडलं.