Saurabh Netravalkar Biography :आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत 11व्या सामन्यात अमेरिकेनं सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव केलाय. या विजयात अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकरचा सर्वात मोठा वाटा होता. त्यानं सुपर ओव्हरमध्ये 18 धावांचा बचाव केला आणि पाकिस्तानच्या फलंदाजांना केवळ 13 धावाच करू दिल्या. यासह अमेरिकेनं सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानवर 5 धावांनी विजय नोंदवला. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोण आहे सौरभ नेत्रावलकर ज्यानं अमेरिकेला विजय मिळवून दिला.
कोण आहे सौरभ नेत्रावलकर :सौरभ नेत्रावलकर हा भारतीय वंशाचा अमेरिकन क्रिकेटपटू आहे. तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे. त्याचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 रोजी मुंबईत झाला. सौरभचं बालपण मुंबईत गेलं. सध्या तो अमेरिकेकडून क्रिकेट खेळतोय. अमेरिका संघात तो डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून खेळताना दिसतो. अमेरिकेसाठी खेळण्यापूर्वी सौरभ भारतीय क्रिकेट संघाकडून अंडर-19 विश्वचषक खेळलाय. यासोबतच तो मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटही खेळला आहे. मुंबई ते अमेरिकेसाठी क्रिकेट खेळण्याचा त्याचा प्रवास खूपच रंजक आहे.
सौरभ नेत्रावळकरशी संबंधित काही महत्त्वाच्या आणि रंजक गोष्टी
- सौरभनं 2008-09 मध्ये कूच विहार ट्रॉफीमध्ये 6 सामन्यात 30 विकेट घेतल्या होत्या.
- सौरभ 2010 मध्ये भारतासाठी अंडर-19 वर्ल्ड कप खेळला आणि भारतासाठी सर्वाधिक 9 विकेट घेतल्या.
- सौरभन 2013 मध्ये मुंबईकडून रणजी ट्रॉफीही खेळली आहे.
- सौरभनं 2016 मध्ये अमेरिकेत ओरॅकल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
- सौरभचा 2018 मध्ये अमेरिका क्रिकेट संघात समावेश करण्यात आला होता.
- सौरभ 2019 मध्ये यूएसए क्रिकेट संघाचा कर्णधार झाला.
- सौरभनं टी-20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रमही केलाय. त्यानं 2022 मध्ये सिंगापूरविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या होत्या.
- सौरभनं अमेरिकाकडून 48 एकदिवसीय सामन्यात 73 आणि 28 टी-20 सामन्यात 27 बळी घेतले आहेत.