T20 World Cup 2024 :टी-20 विश्वचषक 2024च्या 31व्या सामन्यात नेपाळला केवळ 1 धावांनी पराभव पत्करावा लागलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात नेपाळसमोर विजयासाठी 116 धावांचं लक्ष्य होतं, परंतु नेपाळ संघाला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 114 धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे तबरेज शम्सी ज्यानं नेपाळला 5 विकेट्स घेऊन विजयापासून रोखलं. पण नेपाळनं आपल्यापेक्षा अनेक पटींनी बलाढ्य असलेल्या आफ्रिकेला जबरदस्त टक्कर दिली. त्यासाठी नेपाळ संघाचं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे.
नेपाळची दमदार गोलंदाजी :या सामन्यात नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेपाळचा हा निर्णय योग्य होता, कारण त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकात केवळ 115-7 धावाच करू दिल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी सलामीवीर रिझा हेंड्रिक्सनं 49 चेंडूत 43 धावांची शानदार खेळी केली. ट्रिस्टन स्टब्सनं 18 चेंडूत 27 धावा केल्या. नेपाळ संघासाठी कुशल भुर्तेल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्यानं 19 धावात 4 बळी घेतले. तर दीपेंद्र सिंगनं 4 षटकात 31 धावा देत 3 बळी घेतले.
तबरेझ शम्सी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नेपाळ संघानंही सातत्यानं विकेट गमावल्या. 35 धावांपर्यंत नेपाळचा संघ 2 गडी बाद झाला. मात्र यानंतर आसिफ शेख (42) आणि अनिल शहा (27) यांनी संघाची धुरा सांभाळली. मात्र याशिवाय सर्व नेपाळी फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. सामनावीर तबरेझ शम्सी हा दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्यानं 4 बळी घेतले.
शेवटच्या षटकाचा थरार :नेपाळला शेवटच्या 6 चेंडूत 8 धावांची गरज होती. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमनं ओटनिल बार्टमनवर विश्वास ठेवला.19 षटकांच्या अखेरीस नेपाळी संघाची धावसंख्या 108/6 होती, त्यावेळी सोमपाल कामी (8) आणि गुलशन झा (0) क्रीजवर होते. पहिल्या दोन चेंडूवर गुलशन झा याला एकही धाव काढता आली नाही. तिसऱ्या चेंडूवर गुलशननं चौकार लगावला. चौथ्या चेंडूवर गुलशननं दोन धावा काढल्या. पाचव्या चेंडूवर एकही धाव मिळू शकली नाही आणि नेपाळसाठी समीकरण कठीण झालं. शेवटच्या चेंडूवर नेपाळला जिंकण्यासाठी 2 धावा तर टाय करण्यासाठी एका धावेची गरज होती. बार्टमनचा वेगवान चेंडू गुलशनला खेळता आला नाही. चेंडू विकेटकीपर क्विंटन डी कॉककडं गेला. त्यानं हुशारीनं चेंडू मिडविकेटला उभ्या असलेल्या क्लासनकडं फेकला. त्यानं नॉन स्ट्रायकिंग एन्डला स्टंप्सवर चेंडू फेकत गुलशनला बाद केलं.
- 19.1 : 0 धावा
- 19.2: 0 धावा
- 19.3: 4 धावा
- 19.4: 2 धावा
- 19.5: 0 धावा
- 20 षटकं: फलंदाज बाद
टी-20 विश्वचषकात 1 धावानं विजय
- दक्षिण आफ्रिका विरूद्ध न्यूझीलंड, लॉर्ड्स, 2009
- न्यूझीलंड विरूद्ध पाकिस्तान, ब्रिजटाउन, 2010
- भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका , कोलंबो, 2012
- भारत विरूद्ध बांगलादेश, बंगळुरू, 2016
- झिम्बाब्वे विरूद्ध पाकिस्तान, पर्थ, 2022
- दक्षिण आफ्रिका वि पाकिस्तान, किंग्सटाउन, 2024