महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अफगाणिस्तानच्या विजयानंतर काय आहे सेमीफायनलचं समीकरण; उपांत्य फेरी गाठणं भारतासाठीही आहे कठीण - T20 World Cup 2024 - T20 WORLD CUP 2024

T20 World Cup 2024 Semifinal Scenario : वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेलं टी 20 विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आलं आहे. मात्र तरीही सुपर-8 चा कोणताही संघ अद्याप उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद होऊ शकतात.

t20 world cup 2024
टी 20 विश्वचषक (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 8:14 PM IST

हैदराबाद T20 World Cup 2024 Semifinal Scenario : वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेलं टी 20 विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आलं आहे. मात्र तरीही सुपर-8 च्या आठही संघांमध्ये उपांत्य फेरी गाठण्याची शर्यत अतिशय रोमांचक राहिली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोनच असे संघ आहेत ज्यांनी आपापल्या गटात आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत. पण ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि अगदी इंग्लंडलाही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर होण्याचा धोका आहे. आज अफगाणिस्ताननं कांगारुंच्या केलेल्या पराभवानंतर सुपर-8 मधील सर्व संघांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी किती संधी आहे ते जाणून घ्या.

सुपर-8 मधील पहिल्या गटात काय स्थिती :

  • भारत -भारत आपले दोन्ही सामने जिंकून ग्रुप 1 मध्ये सध्या अव्वल स्थानावर आहे. त्यांचे 4 गुण झाले आहेत. पण जर भारतीय संघानं आपला शेवटचा सुपर-8 सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला तर त्यांच्यासाठी उपांत्य फेरी गाठणं कठीण होऊ शकतं. मात्र ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर रोहित ब्रिगेड उपांत्य फेरीसाठी सहज पात्र ठरु शकते. मात्र भारताचा पराभव झाल्यास त्यांना इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.
  • ऑस्ट्रेलिया - अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचे 2 सामन्यात 2 गुण झाले आहेत. जर कांगारुच्या संघानं भारताला पराभूत केलं तर त्यांच्या चांगल्या धावगतीमुळं उपांत्य फेरीतील त्यांचं स्थान जवळपास निश्चित होईल. मात्र भारताकडून कांगारु हरले तर अफगाणिस्तान किंवा बांगलादेश उपांत्य फेरीतील त्यांचं स्थान बळकावू शकतात.
  • अफगाणिस्तान - अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयासह उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता अफगाणिस्तान संघानं शेवटच्या सामन्यात बांगलादेशला मोठ्या फरकानं पराभूत केले तर उपांत्य फेरीत प्रवेश करु शकतात. दुसरीकडं जर भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तर अफगाण संघ बांगलादेशवर विजय नोंदवूनच उपांत्य फेरीत जाईल.
  • बांगलादेश - बांगलादेशनं आतापर्यंत सुपर-8 मधील आपले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळं त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा मार्ग सर्वात कठीण आहे. पुढील सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवलं तर बांगलादेशला अफगाणिस्तानवर मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागेल, की त्यांची धावगती ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानपेक्षा चांगली होईल.

सुपर-8 मधील दुसऱ्या गटाची स्थिती कशी :

  • दक्षिण आफ्रिका - आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकून दक्षिण आफ्रिका दुसऱ्या गटात अव्वल स्थानावर आहे. आफ्रिकन संघ या टी 20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. परंतु, पुढील सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्धचा पराभव त्यांना महागात पडू शकतो. जर दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिजविरुद्ध हरला, तर अमेरिकेनं इंग्लंडला हरवण्याची आशा करावी लागेल, ज्याची शक्यता फारच कमी दिसते.
  • वेस्ट इंडिज - दक्षिण आफ्रिकेला हरवून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची स्थिती वेस्ट इंडिजसाठी स्पष्ट झाली आहे. आफ्रिकेविरुद्ध हरले तरी ते टॉप-4 मध्ये जाऊ शकते, पण त्यासाठी इंग्लंड अमेरिकेविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत हरेल, अशी आशा बाळगावी लागेल.
  • इंग्लंड - सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडनं अमेरिकेला हरवलं तरी उपांत्य फेरीतील त्यांचं स्थान निश्चित होणार नाही. पुढच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव झाला तर इंग्लंड अमेरिकेवर विजय नोंदवून पात्र ठरेल. दुसरीकडं वेस्ट इंडिजनं दक्षिण आफ्रिकेला हरवलं तर आफ्रिकेची धावगती त्यापेक्षा कमी होईल, अशी आशा इंग्लंडला करावी लागेल.
  • अमेरिका - सेमीफायनलचा मार्ग अमेरिकेसाठी खूपच कठीण आहे. अखेरच्या सामन्यात इंग्लंडला पराभूत केलं तरी इतर सामन्यांचे निकाल आपल्या बाजूनं लागतील अशी आशा करावी लागेल. अमेरिकेला केवळ इंग्लंडला मोठ्या फरकानं पराभूत करावं लागणार नाही तर दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिजविरुद्ध मोठ्या फरकानं जिंकेल अशी प्रार्थना करावी लागणार आहे.

हेही वाचा :

  1. 'कांगारुं'कडून अफगाणिस्तानचा तीन वेळा अपमान; आता टी 20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला धूळ चारत घेतला बदला - T20 World Cup 2024
  2. अफगाणिस्तानचा टी-20 विश्वचषकात ऐतिहासिक विजय, 21 धावांनी ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव - T20 World Cup 2024

ABOUT THE AUTHOR

...view details