नवी दिल्ली PM Modi Wishes for IND vs BAN Match : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी 20 क्रिकेट विश्वचषकात आज सुपर-8 फेरीत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय संघ हा सामना जिंकून उपांत्य फेरीतलं आपलं स्थान पक्कं करण्याचा प्रयत्न करेल, तर बांगलादेशला सुपर-8 मधील पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. या सामन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी : पंतप्रधान मोदींनी शनिवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरुन बांगलादेशच्या पंतप्रधान दोन दिवसांच्या दौऱ्यावर शुक्रवारी भारतात आल्या आहेत. याशिवाय दोन्ही नेत्यांनी सशस्त्र दलांचं आधुनिकीकरण, दहशतवाद आणि कट्टरवाद यावरही चर्चा केली. या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी दोन्ही संघांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "टी 20 विश्वचषकातील आजच्या सामन्यासाठी मी भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा विकासातील भागीदार आहे आणि आम्ही बांगलादेशसोबतच्या आमच्या संबंधांना सर्वोच्च प्राधान्य देतो."