T20 World Cup India Beat Australia :भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलिया संघाला 24 धावांनी धोबी पछाड देत टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दिमाखदार एन्ट्री केली. भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया संघापुढं विजयासाठी 205 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 181 धावाच करू शकला. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सळो की पळो करुन सोडत या सामन्यात विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघानं ऑस्ट्रेलियन संघाला टी20 विश्वचषकात धूळ चारत विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला.
रोहित शर्माची झुंजार खेळी :ऑस्ट्रेलियन संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं केवळ 41 चेंडूत 92 धावांची धडाकेबाज फलंदाजी केली. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पिसं काढली. या खेळीत शर्मानं 7 चौकार आणि 8 उत्तुंग षटकार ठोकले. भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवनंही जोरदार फलंदाजी केली. सूर्यकुमार यादवनं 16 चेंडूत 31 धावा कुटल्या. तर शिवम दुबे 28 आणि हार्दिक पांड्यानं नाबाद 27 धावा केल्या. भारतीय संघानं 20 षटकात 205 धावा केल्या.
भारतीय गोलंदाज पडले भारी :भारतीय संघानं दिलेलं 206 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच भारतीय गोलंदाजांनी धक्के दिले. भारतीय संघानं पहिल्याच षटकात वॉर्नरची शिकार केली. ऑस्ट्रेलियन संघानं 6 धावांवर वॉर्नरचा बळी गमावल्यानं बॅकफूटवर आला. मात्र ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलियासाठी पुन्हा एकदा तारणहार बनून आला. ट्रॅव्हिस हेडनं मिचेल मार्शला जोडीला घेत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. ही जोडी संघाला मजबूत स्थितीत नेण्यात यशस्वी होईल, असं वाटत असताना कर्णधार रोहित शर्मानं आपलं हुकमी अस्त्र बाहेर काढलं. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात अक्षर पटेलनं मार्शचा सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतला. हा या सामन्यातील महत्वाचा बळी ठरला. त्यानंतर कुलदीप यादवनं मॅक्सवेलला तंबूचा रस्ता दाखवला. दुसरीकडं ट्रॅव्हिस हेड फटकेबाजी करत असल्यानं ऑस्ट्रेलियाच्या आशा जीवंत होत्या. मात्र भारतीय संघाचा हुकमी गोलंदाज जसप्रित बुमराह यानं ट्रॅव्हिस हेडची शिकार केली. ट्रॅव्हिस हेड बाद झाल्यानं भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. जसप्रित बुमराहनं 4 षटकात 29 धावा देत 1 विकेट मिळवली. तर अर्शदीप सिंहनं तीन फलंदाजांना तंबूची वाट दाखवत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.
टी 20 विश्वचषकात भारतीय संघाचा विश्वविक्रम : भारतीय संगानं ऑस्ट्रेलियाच्या संघावर विजय मिळवत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. टी20 विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकणारा संघ म्हणून भारतीय क्रिकेट संघानं विश्वविक्रम केला. टी20 विश्वचषकात भारतीय संघानं आतापर्यंत 50 सामने खेळले आहेत. त्यातील 34 सामने भारतीय संघानं जिंकले आहेत. तर 15 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या विजयासह भारतीय संघानं श्रीलंकेच्या संघाला मागं टाकलं आहे. श्रीलंकन संघान आतापर्यंत 33 सामने जिंकले आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 31 सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत प्रत्येकी 30 सामने जिंकले आहेत.
हेही वाचा :
- टी 20 विश्वचषकातून यजमान संघ बाहेर; नऊ हंगामात 'ही' परंपरा कायम - T20 World Cup
- बटलरच्या वादळी खेळीनंतर इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक! अमेरिकेचा 10 गडी राखून केला पराभव - T20 World Cup 2024
- पाच चेंडूत चार विकेट...; टी 20 विश्वचषकात 14 तासांत दुसरी हॅट्ट्रिक; इंग्लंडच्या गोलंदाजानं रचला इतिहास - T20 WORLD CUP 2024