पालघर : महायुतीमध्ये किंवा भाजपामध्ये कोठेही वाद नाही. तर पालघर जिल्ह्यात विधानसभेच्या सहा जागा असून सहाच्या सहा जागा महायुती जिंकेल आणि राज्यात महायुतीचं सरकार येईल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी व्यक्त केलाय.
निकम यांच्या बंडाचा परिणाम शून्य : पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. तर दोन विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. विक्रमगड विधानसभा मतदारसंघात हरिश्चंद्र भोये हे निवडणूक लढवीत असून, प्रकाश निकम यांच्या बंडखोरीचा त्यांच्या उमेदवारीवर कोणताही परिणाम होणार नाही. तर भोये चांगल्या मतांनी निवडून येतील, असा दावा राजपूत यांनी केलाय.
महायुतीच्या योजनांवर लोकांचा विश्वास : "लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं असलं, तरी विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला अजिबात स्थान मिळणार नाही. गेल्या पाच महिन्यात राज्यातील महायुती सरकारनं लाडकी बहीण सारख्या विविध योजना आणल्या. त्याचा प्रभाव मतदाराना दिसून येतोय. देशात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले. जनतेच्या मनात विकासाची आशा निर्माण झाली असून, महाविकास आघाडीच्या कोणत्याही घोषणांना जनता थारा देणार नाही", असे ते म्हणाले.
अडीच वर्षांपूर्वीचे सरकार घरात : "अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी कोणत्याही विकासाचची काम केली नाहीत. कोरोना काळात लोक मृत्यु पावत होते. लोकांना औषधाची गरज होती. लोक सैरभैर झाले होते. अशावेळी सरकारनं त्यांना मदत करण्याऐवजी उलट सरकार घरात दडून बसले. औषध खरेदीत गैरप्रकार झाले. लोकांना याची चांगलीच माहिती असून, आता महाविकास आघाडीला कोणत्याही परिस्थितीत लोक जवळ करणार नाही". डहाणू, पालघर, वसई आणि विक्रमगड, नालासोपारा आणि बोईसर या सहा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा दावा राजपूत यांनी केलाय.
हेही वाचा -