नागपूर : महाराष्ट्रात पूर्ण बहुमतानं महायुती सरकार सत्तेत येणार असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. ते आज नागपूर येथं बोलत होते. राज्यातील जनतेनं आमचा जाहीरनामा मान्य केला. काँग्रेसचा जाहीरनामा धुळखात पडलाय. तो कोणीही मान्य करत नाही. काँग्रेस खोटं बोलत आहे, हे जनतेला कळलं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
जनतेचा कल महायुतीकडे : "165 च्या वर आमच्या जागा निवडून येतील आणि प्रचंड बहुमतानं महायुतीचं सरकार येणार. सध्या तरी कोणत्याही अपक्षासोबत आमचा संपर्क नाही. काँग्रेसनं लोकसभेत खोटं बोलून जो अप-प्रचार केला, त्यामुळं जनतेचा आता त्यांच्यावर विश्वास नाही. हरियाणात ज्या पद्धतीनं काँग्रेसला दूर केलं, तशीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. जनतेचा कल महायुतीकडे असल्यानं पूर्ण बहुमतानं आमचं सरकार येणार," असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
शरद पवारांच्या नादी त्यांचेचं लोक लागले : शरद पवारांनी एका सभेत बोलताना कुणाचाही नाद करा, पण माझा नाद करू नका, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. "शरद पवारांच्या नादी त्यांचेच लोक लागले आहेत. आम्हाला त्यांच्या नादी लागायची गरजचं नाही. आमच्याकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं एवढं काम आहे की, आम्ही कामाच्या भरोशावर मतं मागू शकतो. त्यामुळं आम्ही शरद पवारांच्या नादी लागायचं काहीच काम नाही. त्यांनी ईडी, सीबीआयबद्दल न बोलता विकासाबद्दल बोलावं," असा टोला त्यांनी शरद पवारांना लगावला.
राहुल गांधींवर लोकांची चीड : "दीड लाख लोकांसोबत माझा संपर्क आहे. मी घरून निघत असताना ताफा घेऊन निघत नाही, एकटा निघत असतो. काल मी कामठीमध्ये मोटरसायकलवर फिरलो. मी साधेपणानं फिरत आहे आणि जनता माझ्यामागं उभी आहे," असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. "राहुल गांधी अमेरिकेत देशाला आरक्षणाची गरज नाही, असं जाहीर बोलले. एससी, एसटी, ओबीसीला आरक्षणाची गरज नाही, असं ते म्हणाले. त्यामुळं राहुल गांधींवर लोकांची चीड आहे," असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
हेही वाचा