T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 च्या लीग टप्प्यातील 25 व्या सामन्यात आज भारत-अमेरिका हे दोन्ही अपराजित संघ आमने-सामने आहेत. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रात्री 8 वाजता हा सामना खेळवला जाईल. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भारतीय वंशाचा अमेरिकाचा कर्णधार मोनांक पटेलविरुद्ध लढताना दिसणार आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकही सामना झाला नाहीय. क्रिकेटच्या इतिहासात भारत- अमेरिका पहिल्यांदाच भिडणार आहेत.
सुपर-8 मध्ये स्थान मिळविण्यासाठी भिडतील : हा सामना जिंकून भारतीय संघाला अ गटातून 'सुपर 8' मध्ये आपलं स्थान पक्कं करायचं असेल, तर अमेरिकेचा संघही त्याच इराद्यानं मैदानात उतरेल. या दोन्ही संघांनी लीग टप्प्यात आतापर्यंत 2-2 सामने खेळले असून दोन्ही सामन्यात विजय मिळवलाय. 4- 4 गुणांसह दोन्ही संघ अव्वल स्थानावर आहेत. टीम इंडिया चांगल्या रनरेटसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर यूएसएचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता विजेत्या संघाला 'सुपर 8' मध्ये आपलं स्थान निश्चित करण्याची संधी असेल.
अमेरिकेच्या 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा : अमेरिकेनं आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यांमध्ये कॅनडा आणि पाकिस्तानसारख्या मोठ्या संघांना पराभूत केलं आहे. या उत्कृष्ट कामगिरीमध्ये भारतीय वंशाच्या खेळाडूंनी जबरदस्त भूमिका बजावली असून त्यात कर्णधार मोनांक पटेल, सौरभ नेत्रावलकर आणि हरमीत सिंग यांच्या नावाचा समावेश आहे. आता या सर्व खेळाडूंकडून भारताविरुद्धही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. याशिवाय आरोन जोन्स, ड्राईस गस आणि कौरी अँडरसन हे देखील भारतासाठी घातक ठरू शकतात.
भारताच्या 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा :टी-20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या सामन्यात भारतानं आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केलाय. आता भारतासमोर अमेरिकेचं आव्हान असेल. या सामन्यात रोहित शर्मा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग या खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असेल. यासोबतच विराट कोहलीला या सामन्यात फॉर्ममध्ये परतण्याची संधी आहे.
दोन्ही संघ
- भारताचा संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
- अमेरिकेचा संघ - स्टीव्हन टेलर, मोनांक पटेल (यष्टीरक्षक/कर्णधार), अँड्रिज गॉस, ऍरोन जोन्स, नितीश कुमार, कोरे अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रावळकर, अली खान, निसर्ग पटेल, शायन जहांगीर, मिलिंद कुमार, शेडली व्हॅन शाल्कविक
पाकिस्तान सुपर-8 मध्ये कसा पोहोचेल?
- पाकिस्तानला येथून सुपर-8 मध्ये आपलं स्थान निश्चित करायचं असेल तर त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावेच लागतील तेही मोठ्या फरकानं. कारण पाकिस्तानचा नेट रन रेट सध्या मायनसमध्ये आहे. तर अमेरिकेचा नेट रन रेट प्लसमध्ये आहे. त्यामुळं बाबर आझम अँड कंपनीला हे दोन्ही सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागतील.
- भारताच्या विजयासाठी प्रार्थना केल्याशिवाय पाकिस्तान संघ साखळी टप्प्यातून पुढील फेरी गाठू शकत नाही. भारत आज अमेरिकेशी तर 15 जूनला कॅनडाशी भिडणार आहे. भारतानं हे दोन्ही सामने जिंकावेत, अशी प्रार्थना पाकिस्तानला करावी लागेल. भारतीय संघानं अमेरिकेला मोठ्या फरकानं पराभूत केलं तर त्याचा थेट फायदा पाकिस्तानला मिळेल.
- आयर्लंडनं आतापर्यंत दोन खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. आता 14 जूनला आयर्लंडचा सामना अमेरिकेशी होणार आहे. हा सामनाही अमेरिका हरेल, अशी प्रार्थना पाकिस्तानला करावी लागेल. जर अमेरिका जिंकला तर पाकिस्तानला दोन सामने जिंकूनही फायदा होणार नाही.
हेही वाचा
- पाकिस्तानला पराभवाची धूळ चारणारा सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण? - Saurabh Netravalkar Biography
- ''घाणेरडं तोंड उघडण्यापूर्वी...''; अकमलच्या वादग्रस्त विधानावर हरभजन सिंगनं दिलं जोरदार प्रत्युत्तर - T20 World Cup 2024
- पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय क्रिकेट प्रेमींचा जल्लोष, पहा व्हिडिओ - T20 World Cup 2024