Gulbadin Naib Fake Injury :आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या सुपर-8 सामन्यात बांगलादेशचा पराभव करून अफगाणिस्ताननं इतिहास रचला. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे बांगलादेशचा 8 धावांनी पराभव करत अफगाण संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला. या विजयासह बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचं टी-20 विश्वचषकाचं स्वप्न भंगलं. अफगाणिस्तानच्या विजयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
नेमकं काय घडलं? :बांगलादेशच्या डावाच्या 12 व्या षटकात गुलबदिन नायबची झालेली दुखापत क्रिकेटविश्वात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अफगाणिस्तानचा संघ डकवर्थ लुईस नियमानुसार धावसंख्येपेक्षा थोडा पुढं होता. सामन्या दरम्यान अनेकदा पाऊस पडल्यामुळं खेळात व्यत्यय येत होता. याचाच फायदा घेत अफगाणिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी डग आऊटमधून खेळाडूंना इशारा करत सामना लांबवण्याचा इशारा दिला.
गुलबदीन नायब हा स्लिपमध्ये उभा होता. तो अत्यंत नाट्यमय पद्धतीनं पायाला धरून मैदानावर पडला. आपल्याला दुखापत झाल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळं सामना लांबला. अफगाणिस्तानचा फिजिओ मैदानात आला. त्यात पावसाचं आगमन झाल्यामुळं सामना थांबवावा लागला. डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेश संघ पिछाडीवर होता. बांगलादेशला 19 षटकात 114 धावा करायच्या होत्या. मात्र बांगलादेशचा संघ 17.5 षटकात 105 धावा करू सर्वबाद झाला. हा सामना अफगाणिस्तानने 8 धावांनी जिंकला.
गुलबदिन नाईबच्या दुखापतीवर इंग्लडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने संताप व्यक्त केला आहे. मायकेल वॉन गुलबदिन नाईबची खिल्ली उडवली आहे. त्यानं म्हटलं की, ''दुखापत झाल्यानंतर 25 मिनिटांत विकेट घेणारा गुलबदिन हा खेळाच्या इतिहासातील पहिला क्रिकेटपटू ठरला. हे पाहून आनंद झाला…''