डल्लास T20 World Cup 2024 USA vs PAK :आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 चा 11 वा सामना अमेरिका ( USA) आणि पाकिस्तान यांच्यात डॅलस येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळण्यात आला. नाणेफेक हारल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 159 धावा केल्या होत्या. यूएसएचा संघानं 20 षटकांत केवळ 159 धावा केल्यानं सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा अमेरिका संघाकडून लाजिरवाणा पराभव झाला.
- सुपर ओव्हरमध्ये ॲरॉन जोन्स आणि हरमीत सिंग अमेरिकेकडून फलंदाजीला आले. दोघांनी 18 धावा करत पाकिस्तानला 19 धावांचं लक्ष्य दिलं. यानंतर 19 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाला 6 चेंडूत केवळ 13 धावा करता आल्या.
सुपर ओव्हरचा थरार :सुपर ओव्हरमध्ये यूएसएनं प्रथम फलंदाजी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरनं सुपर ओव्हर टाकायचा निर्णय झाला. पण अत्यंत गचाळ क्षेत्ररक्षण आणि खराब गोलंदाजी यामुळं अमेरिकेच्या फलंदाजांनी 18 धावा केल्या. 19 धावांचं लक्ष्य पूर्ण करताना सौरभ नेत्रावळकरच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानने नांगी टाकली. इफ्तिकारनं एक चौकार लगावत आशा पल्लवित केल्या. पण सौरभच्या डोक्यावरून मोठा फटका खेळायचा इफ्तिकारचा प्रयत्न नितीशच्या अफलातून झेलमुळं यशस्वी झाला नाही. पण सौरभनं भेदक गोलंदाजी करत अमेरिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
पाकिस्तानचा सुरुवातीचा डाव फसला : पाकिस्तानसोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात अमेरिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज नॉस्तुश केन्झिगेनं 30 धावांत तीन बळी घेतले. त्यामुळं पाकिस्तान संघ सात विकेट्सवर केवळ 159 धावा करू शकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा अमेरिकेचा निर्णय योग्य ठरला. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात स्टीव्हन टेलरने सौरभ नेत्रावलकरच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर फखर जमानने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाचव्या षटकात अली खानच्या चेंडूवर तो बाद झाला. पाकिस्ताननं 26 धावांत तीन विकेट गमावल्या. मोहम्मद रिझवान 9 धावा करून, उस्मान खान 3 आणि फखर जमान 11 धावा करून बाद झाला.