सिडनी Coach Replaces as Player : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये एक अनोखी घटना पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सिडनी थंडर संघानं आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. खरं तर, आतापर्यंत वॉर्नर ज्याच्या कोचिंगखाली सामने खेळत होता, त्याला आता खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. एकाच वेळी अनेक खेळाडूंच्या दुखापती हे त्यामागचं कारण आहे. सिडनी थंडर सध्या कठीण काळातून जात आहे. संघातील 5 खेळाडू संघाबाहेर आहेत. यात चार खेळाडू जखमी झाले आहेत. तर 19 वर्षांचा युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टन्स भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत होता.
41 वर्षांचा प्रशिक्षक बनला खेळाडू : माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅन ख्रिस्टीयन गेल्या दोन सत्रांपासून सिडनी थंडरसोबत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून जोडला गेला आहेत. मात्र अचानक 5 खेळाडू बाहेर पडल्यानं त्याचा बदली म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. हा 41 वर्षांचा अष्टपैलू खेळाडू प्रशिक्षकापासून खेळाडू होण्यासाठी खूप उत्सुक आहे. पुढील सामन्यात तो सिडनी संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध असेल. तो यापुढंही संघाला प्रशिक्षण देणार आहे. म्हणजेच तो एकाच वेळी प्रशिक्षक आणि खेळाडूची भूमिका बजावेल.