गॉल Steve Smith : ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 29 जानेवारीपासून गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजा यांनी डावाची सुरुवात शानदार पद्धतीनं केली आणि केवळ 14 षटकांतच 91 धावा केल्या. यानंतर पुढच्याच षटकात, अर्धशतक झळकावून ट्रॅव्हिस हेड बाद झाला. 15 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाला मार्नस लाबुशेनच्या रुपानं आणखी एक मोठा धक्का बसला. 20 धावा काढून लाबुशेन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ नवीन फलंदाज म्हणून मैदानात आला आणि त्यानं एक धाव घेताच मोठा विक्रम रचला.
स्टीव्ह स्मिथच्या नावावर रेकॉर्ड : प्रभात जयसूर्याच्या गोलंदाजीवर एक धाव घेऊन स्मिथनं कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या. कसोटीत 10,000 धावा करणारा स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा चौथा आणि एकूण 15वा फलंदाज ठरला. 115व्या कसोटी सामन्याच्या 205 व्या डावात स्मिथनं ही मोठी कामगिरी केली. यासह, स्मिथनं सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गजांचे मोठे विक्रम मोडले. स्मिथनं 115 कसोटी सामन्यांमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या, तर सचिन तेंडुलकरनं 122 कसोटी सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा (सामन्यांनुसार) :
- ब्रायन लारा - 111 सामने
- कुमार संगकारा - 115 सामने
- स्टीव्ह स्मिथ - 115 सामने
- युनूस खान - 116 सामने
- रिकी पॉन्टिंग - 118 सामने
- जो रूट - 118 सामने
- राहुल द्रविड - 120 सामने
- सचिन तेंडुलकर - 122 सामने