हैदराबाद Most Wickets on No Balls : क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाचं जास्तीत जास्त विकेट घेण्याचं स्वप्न असतं. यात काही गोलंदाज यशस्वी होतात तर काहींना अपयश येतं. तसंच काही गोलंदाजांना काही चुकांमुळं देखील विक्रम करण्याची संधी हुकते. मात्र यातून त्यांच्या नावावर काही नकोशा विक्रमांची नोंद होते. असाच एक विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज आणि सध्या भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाजी कोच असलेल्या मोर्ने मॉर्केलच्या नावावर आहे. त्यानं त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत एक दोन नव्हे तर तब्बल 14 वेळा नो बॉलवर विकेट घेतली आहे. हा एक विश्वविक्रम आहे. विशेष म्हणजे त्यानं दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी, वनडे आणि T20 प्रकारात एकत्रितपणे 550 हून अधिक विकेट घेतल्या आहेत.
काय म्हणाला होता मॉर्केल :2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्या नावावर या नकोशा विक्रमाची नोंद झाली. 6 फूट 5 इंच उंची असलेल्या मॉर्केलची उंची आणि मोठी शरीरयष्टी हे त्याच्या अनेक नो बॉलमागील कारण मानलं जातं. पण मॉर्केल स्वतः असं मानत नव्हता. हा विक्रम त्याच्या नावावर झाल्यावर तो म्हणाला होता, की त्याच्या उंचीपेक्षा त्याच्या सवयी यासाठी जास्त जबाबदार आहेत. "मला लय आणि वेळेची गरज आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी कसोटी सामन्यांमध्ये जितकी जास्त गोलंदाजी केली तितकं माझं वेळेचं नियोजन चांगलं होत गेलं," असं त्यानं त्यावेळी म्हटलं होतं.
क्रिकेट कारकिर्द कशी : मोर्ने मॉर्केल दक्षिण आफ्रिकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आणि या काळात त्यानं संघाच्या यशातही मोठा हातभार लावला. सुमारे साडेसहा फूट उंच असलेल्या या वेगवान गोलंदाजानं आपल्या देशासाठी 86 कसोटी सामन्यांमध्ये 309 विकेट घेतल्या. त्याचबरोबर 117 एकदिवसीय सामन्यांमध्ये 188 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्यानं 44 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात 47 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं 2006 मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केलं आणि 2018 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला.
का आहे प्रशिक्षक : टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी मॉर्केलची निवड करण्यामागं गंभीरचा त्याच्यावर असलेला विश्वास हे कारण होतं. कारण दोघांनी दीर्घकाळ एकत्र काम केलं आहे. गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असताना मॉर्केल त्याच्या संघात होता. यानंतर, जेव्हा गंभीर 2 वर्ष लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता, तेव्हा त्यानंच मॉर्केलला फ्रेंचायझीमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून आणलं. तसंच त्याआधी मॉर्केल पाकिस्तान क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक देखील होता आणि 2023 च्या वनडे विश्वचषकादरम्यान तो त्या संघाशी संबंधित होता.
हेही वाचा :
- 'IAS' मुळं टीम इंडिया नागपूर वनडेत विजयी...! मालिकेत घेतली आघाडी
- SL vs AUS दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुणे वर्चस्व कायम राखणार? 'इथं' पाहा लाईव्ह मॅच
- पाकिस्तानच्या बाबर आझमवर Champions Trophy पूर्वी मोठं संकट...! सोशल मीडियावर पोस्ट दिली माहिती